जळगाव जिल्ह्यातील हतनूर धरणातून तापी नदीत विसर्ग सुरू आहे. यामुळे नदीला आलेल्या पुरात गाळाचे प्रमाण वाढून भुसावळ शहरातील पाणीपुरवठ्याचे रोटेशन २४ ते ३६ तासांनी पुढे लोटले गेले. साडेपाच कोटी रुपये निधीतून पहिल्या टप्प्यात जलशुद्धीकरण केंद्रातील १२ एमएलडी क्षमतेच्या यंत्रणेचे नूतनीकरण झाले. तरीही शहराचा पाणीप्रश्न सुटलेला नाही. यामुळे ऐन पावसाळ्यात टँकरने पाणीपुरवठा करण्याची नामुष्की पालिकेवर ओढवली.
शहरातील अमृत योजना पूर्ण होईपर्यंत पालिकेने जीर्ण यंत्रणेचे पुनरुज्जीवन हाती घेतले. त्यात पहिल्या टप्प्यात १२ एमएलडी क्षमतेच्या यंत्रणेचे काम पूर्ण झाले. तरीही प्रश्न न सुटल्याने शुक्रवारपासून रोटेशनवर परिणाम झाला. यामुळे रोटेशननुसार गुरुवारी सायंकाळी व शुक्रवारी दिवसभरात पाणीपुरवठा न झालेल्या शहरातील दक्षिण भागात पालिकेने १० टँकरद्वारे पाणीपुरवठा केला. ३१ जुलैपर्यंत टँकर सुरू राहतील, असे पालिकेने स्पष्ट केले आहे. दुसरीकडे १० एमएलडी क्षमतेच्या यंत्रणेचे कामही वेगाने सुरू आहे.
असा होणार पुरवठा
शहरातील उत्तर भागात शुक्रवारी, तर शनिवारी जळगाव रोडवरील गांधी पुतळा ते थेट लोणारी हॉलपर्यंत दोन्ही बाजूंच्या वस्त्यांना पाणीपुरवठा केला जातो. मात्र, रोटेशन बिघडल्याने हा पुरवठा आता शनिवार व रविवारी होईल. तर दक्षिण भागातील ज्या भागांना शुक्रवारी पाणी मिळते तेथे शनिवारी दिवसभरात कोणत्याही वेळी पाणी मिळेल. तर शनिवारी पुरवठा नियोजित असलेल्या भागांना रविवारी दिवसभरात पाणीपुरवठा होईल.