चंद्रपूर जिल्ह्याजवळील वणी तालुक्यातील वर्धा नदीच्या पात्रात दोन वेगवेगळ्या ठिकाणी पोहण्यासाठी गेलेल्या चार युवकांचा वाहून गेल्याने मृत्यू झाला.
ही घटना मंगळवारी दुपारी घडली. चौघांपैकी तिघांचे मृतदेह मिळाले असून एकाचा अद्याप शोध सुरू आहे. चौघांपैकी तिघे चंद्रपूर तर एक वर्धा जिल्ह्यातील आहे. मृतांमध्ये प्रविण सोमलकर (वय 36, रा. चंद्रपूर) दिलीप कोसुरकर (वय 40, रा नायगाव), रितेश नथ्थु वानखडे (वय18) व आदर्श देवानंद नरवाडे (रा. भद्रावती) यांचा समावेश आहे.
मंगळवारी 15 ऑगस्टची सुटी असल्यामुळे सात ते आठ तरूण वणी तालुक्यातील नायगाव शिवारातील वर्धा नदीवर फिरण्यासाठी गेले होते. त्यापैकी काहींजण जलतरणाचा आनंद घेण्याकरीता नदीपात्रात उतरले. त्यांना पाण्यात खोल भागाचा अंदाज न आल्याने ते बुडाले आणि वाहून गेले. प्रविण सोमलकर (रा. चंद्रपूर) व दिलीप कोसुरकर (वय 40, रा. नायगाव) असे मृताचे नाव आहे.
दुसऱ्या घटनेत भद्रावती येथील रितेश नथ्थुण वानखडे व आदर्श देवानंद नरवाडे यांच्यासह पाच तरूण भद्रावती येथून पाच मित्र जुनाड येथील वर्धा नदीच्याा पुलाकडे पर्यटनाकरीता गेले होते. नदीपात्रात उतरून ते पोहत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने ते वाहून गेले.