युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांच्यात नाशिकमध्ये गुप्त भेट झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. दादा भुसे हे महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्याचे कृषीमंत्री होते. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर ते शिंदे यांच्यासोबत गेले. शिंदे सरकार आल्यानंतर ते पुन्हा मंत्री बनले. त्यांना बंदरे आणि खाणकाम विभागाचं मंत्रिपद मिळालं होतं.
काही दिवसांपूर्वी विरोधी पक्षनेते असेलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचा गट सरकारमध्ये सामील झाला. त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांच्यासह राष्ट्रवादीच्या 8 नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यावेळी मंत्र्यांच्या खात्यांमध्ये आदलाबदल करण्यात आली. यावेळी दादा भुसे यांना सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) विभागाचं मंत्रिपद देण्यात आलं. त्यानंतर आता नाशिकमधून वेगळीच बातमी समोर येताना दिसत आहे.
आदित्य ठाकरे आणि दादा भुसे यांच्यात गुप्त भेटीची चर्चा
दादा भुसे आणि आदित्य ठाकरे यांच्यात गुप्त भेट झाल्याची माहिती समोर आली आहे. नाशिकच्या त्र्यंबकेश्वर रोडवरील एका खाजगी रिसॉर्टमध्ये ही भेट झालीय. आदित्य ठाकरे आणि दादा भुसे यांची भेट झालेलं रिसॉर्ट बेजे गावातील असल्याची माहिती मिळत आहे. या भेटीच्या बातमीवर दादा भुसे यांच्याकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. आता आदित्य ठाकरे काय प्रतिक्रिया देतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
विश्वभारत News Website