माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण हे नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद शहरात राजकीय व त्यांच्या खाजगी संस्थेच्या कामाच्या निमित्ताने आले होते. दुपारी लाल बहादुर शास्त्री महाविद्यालयाचे खाजगी कार्यक्रम आटोपून सायंकाळी ते महेश्वरी भवन येथील काँगेस कमिटीच्या वतीने आयोजित कार्यक्रमास पोहचले असता सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी त्यांचा निषेध व्यक्त करीत काळ्या फिती लावून त्यांच्या विरुद्ध घोषणाबाजी केली.
मराठा आरक्षण समितीचे उपाध्यक्ष पद जवळ असतानाही त्यांनी समाजाचा प्रश्न निकाली काढला नाही. आता सर्वत्र समाज बांधव आरक्षणासाठी रस्त्यावर आले असताना सार्वत्रिक राजकीय कार्यक्रम का आयोजीत केला? असा सवाल करीत सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे, म्हणत अशोक चव्हाण यांचा काळ्या फिती लावून निषेध व्यक्त करीत प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली.
परिस्थीतीचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी वेळीच तत्परता दाखवली होती. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.