चायनीज मांजावर बंदी असतानाही त्याची सर्रास विक्री होत आहे. हा मांजा दुचाकीचालकांच्या जीवावर बेतत आहेत. रविवारी दुपारी यवतमाळातील नागपूर रोड ते स्टेटबँक चौक रस्त्यावर मांज्यामुळे पाच वर्षीय चिमुकल्याचा गळा चिरला. जैन रफिक मवाल, असे या चिमुकल्याचे नाव आहे. दुचाकीचालकाने सावधानतेने ब्रेक दाबल्यामुळे तो थोडक्यात बचावला. परंतु, गळा चिरल्यामुळे त्याला गंभीर दुखापत झाली.
रविवार अन् दिवाळीच्या सुट्ट्या असल्याने जैन हा आपला काका वसिम मवाल यांच्यासोबत दुचाकीवर समोर बसून मार्केटमध्ये जात होता. दरम्यान, नागपूर रोडकडून स्टेट बँक चौकाकडे जात असताना गणेश चौकात चायनीज मांजा कुठून तरी उडून या दुचाकीवर आला आणि समोर बसलेल्या जैनच्या गळ्यात अडकला. यामुळे जैनचा गळा चिरला गेला. गाडीचा वेग अधिक असता तर हा मांजा जीवावर बेतला असता. परंतु, थोडक्यात निभावले. ही बाब वसीम यांच्या लक्षात येताच त्यांनी गाडी जागेवर थांबवली आणि जखमेची पाहणी केली. जखम खोल आणि त्यातून होणारा रक्तस्त्राव अधिक असल्याने लगेच शहरातील एका खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले. घटनेचे गांभीर्य पाहता शस्त्रक्रिया करावी लागेल, असा सल्ला डॉक्टरांनी दिला. त्यानुसार रविवारी रात्री उशिरा जैनवर शस्त्रक्रिया पार पडली.
चायनीज मांज्यावर बंदी आहे. पोलीस, वन विभागाला हा मांजा दिसल्यावर कारवाई करण्याचा अधिकार आहे. परंतु, त्यावर कोणीही कारवाई करत नसल्याने सर्रास दुकानांवर हा मांजा विकला जात आहे. सध्या मकरसंक्रांत जवळ येत असून, पतंग उडविण्यासाठी मुले मांजा विकत घेत आहेत. त्यात चायनीज मांजा अत्यंत घातक असतो. त्याने गळा काही क्षणात चिरला जातो. यामुळे संबधित विभागाने यावर तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.