Breaking News

MP, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणात BJP की काँग्रेस? निकाल आज

आगामी लोकसभा निवडणुकीची उपांत्य फेरी मानल्या जाणाऱ्या मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड आणि तेलंगण या चार राज्यांच्या विधानसभा निवडणकीची मतमोजणी आज, रविवारी होईल. निवडणुकीत चारही राज्यांतील दिग्गजांचे राजकीय भवितव्य पणाला लागले आहे. दुपारपर्यंत निकालाचे चित्र स्पष्ट होईल. मध्यप्रदेश आणि राजस्थान या दोन राज्यांत भाजप, तर छत्तीसगड, तेलंगणमध्ये काँग्रेसची सरशी होईल, असा अंदाज मतदानोत्तर चाचण्यांनी वर्तवला असला तरी बहुतांश संस्थांच्या चाचण्यांमध्ये मोठा फरक दिसतो. त्यामुळे या राज्यांत, विशेषत: मध्यप्रदेश आणि राजस्थानमध्ये कोणत्या पक्षाला कौल मिळतो, याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

 

मध्य प्रदेशच्या निवडणुकीत भाजपने शिवराजसिंह चौहान यांना मुख्यमंत्रिपदासाठी उमेदवार जाहीर न करता काही केंद्रीय मंत्र्यांसह, राज्यातील दिग्गज नेत्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले. सामूहिक नेतृत्वाचा चौहान यांच्यासाठी दिलेला हा संदेशच मानला जातो. चौहान यांनी मात्र जोरदार निवडणूक प्रचार राबवत मतदारांना भावनिक आवाहन करण्याचा प्रयत्न केले. राज्यात भाजपचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्रिपद भूषवणारे चौहान पुन्हा जोरदार राजकीय पुनरागमन करणार की प्रतिस्पर्धी काँग्रेस नेते कलमनाथ यांना सत्तेची खुर्ची मिळणार, हे आज स्पष्ट होईल. राजस्थानमध्ये, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि त्यांच्या राजकीय प्रतिस्पर्धी भाजपच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे या दोघांचेही भवितव्य आज ठरेल.

 

चौहान यांच्याप्रमाणेच गेहलोतही त्यांच्या सरकारने राबवलेल्या कल्याणकारी योजनांवर विसंबून आहेत. प्रत्येक निवडणुकीत सत्ताबदल घडवण्याच्या राजस्थानची ३० वर्षांची परंपरा मोडित निघेल आणि पुन्हा सत्ता स्थापन करू, असा गेहलोत यांचा दावा आहे. वसुंधराराजे यांचे भवितव्यही भाजपच्या कामगिरीवरच अवलंबून असेल. भाजपने राजस्थानात मोठे यश मिळवले तर भाजप मुख्यमंत्रिपदासाठी इतर पर्यायांचा शोध घेईल. मात्र, मर्यादित यश मिळाल्यास पक्षासमोर कमी पर्याय असतील आणि वसुंधरा राजेंना संधी मिळण्याची शक्यता आहे.

 

मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये प्रत्येकी सात भाजप खासदार निवडणूक लढवत आहेत, तर छत्तीसगडमध्ये चार आणि तेलंगणमध्ये तीन खासदार रिंगणात आहेत.छत्तीसगडमध्ये, २००३ ते २०१८ दरम्यान मुख्यमंत्रिपद भूषवलेल्या भाजपच्या रमण सिंग यांच्या कामगिरीकडेही राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे. मात्र, छत्तीसगडमध्ये बहुतांश मतदानोत्तर चाचण्यांनी काँग्रेस सत्ता राखण्याचा अंदाज वर्तवला आहे. तसे झाल्यास काँग्रेस पुन्हा भूपेश बघेल यांच्याकडेच मुख्यमंत्रीपद देईल की दुसऱ्या नेत्याला संधी देईल, याबाबतही उत्सुकता आहे.

 

तेलंगणमध्ये सत्ताधारी ‘बीआरएस’ आणि काँग्रेस यांच्यात अटीतटीची लढत आहे. काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळतील, असा अंदाज बहुतांश मतदानोत्तर चाचण्यांनी वर्तवला असला तरी ‘बीआरएस’ने जागांचे अर्धशतक गाठल्यास सत्तासमीकरण कसे असेल, याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. मिझोरम विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सोमवारी होणार आहे.

 

जादुई आकडे असे..

’मध्यप्रदेश : २३० (बहुमत ११६)

 

(२,५३३ उमेदवार, भाजप-

 

काँग्रेस यांच्यात थेट लढत)

 

’राजस्थान : १९९ (बहुमत १०१) (१८०० उमेदवार, काँग्रेस-भाजप यांच्यात थेट लढत)

 

’छत्तीसगड : ९० (बहुमत ४६)

 

(१,१८१ उमेदवार, काँग्रेस-भाजप यांच्यात थेट लढत)

 

’तेलंगण : १२० (बहुमत ६१)

 

(२,२९० उमेदवार, बीआरएस-काँग्रेस यांच्यात थेट लढत)

About विश्व भारत

Check Also

हाईकोर्ट की शर्त मंजूर के साथ मुस्लिम पुलिस कर्मियों को दाढ़ी रखने की अनुमति

हाईकोर्ट की शर्त मंजूर के साथ मुस्लिम पुलिस कर्मियों को दाढ़ी रखने की अनुमति टेकचंद्र …

मौदा तालुक्यातील झुल्लर येथे कंपनीत ब्लास्ट : 1 ठार, 9 जखमी

नागपूर : मौदा तालुक्यातील झुल्लर गावातील एका खासगी कंपनीत आज सकाळी ब्लास्ट झाला. यात एक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *