मिचौंग चक्रीवादळामुळे पूर्व विदर्भात मंगळवार आणि बुधवारी वादळी वारे, मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मिचौंगचे या चक्रीवादळाचे सोमवारी सकाळी साडेआठ वाजता तीव्र चक्रीवादळात रुपांतर झाले आहे. चक्रीवादळ सकाळी साडेसाठ वाजता चेन्नईपासून ईशान्य दिशेला ९० आणि नेल्लोरपासून आग्नेय दिशेला १५० किमीवर अंतरावर होते. तीव्र चक्रीवादळात रुपांतर झाल्यानंतर ते ८५ ते १०५ किमी प्रती तास वेगाने किनाऱ्याकडे झेपावत आहे. तीव्र चक्रीवादळ उद्या दुपारी नेल्लोरच्या जवळ बापटला येथे धडकण्याची शक्यता आहे.
या चक्रीवादळाचा परिणाम म्हणून राज्यात आद्रर्ततेचे प्रमाण वाढणार आहे. प्रामुख्याने विदर्भ आणि मराठवाड्यात ढगाळ वातावरण निर्माण होऊन किमान तापमानात वाढ होईल. तसेच पुढील चार दिवस राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे. मंगळवार आणि बुधवारी पूर्व विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, यवतमाळ आणि गोंदियात वादळी वारे, मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आहे. गुरुवारी, सात डिसेंबरनंतर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात हवामान कोरडे होण्यास सुरुवात होईल. या काळात कोकण किनारपट्टीवरही हवामान कोरडे राहून किमान तापमानात दोन ते तीन अंश सेल्सिअसने घट होईल, अशी शक्यताही हवामान विभागाने व्यक्त केली आहे.