Breaking News

प्रीपेड स्मार्ट वीज मीटर काय आहेत?

देशभरात कुठेही तुम्ही राहत असलात तरी वर्षभरापासून तुम्हाला विजेच्या वापरासाठी आधी पैसे मोजावे लागतील. विजेची बिले थकवणाऱ्यांना आणि विजेची चोरी करणाऱ्या ग्राहकांना चाप बसवण्यासाठी केंद्र सरकारने आता प्रीपेड म्हणजेच वीजे वापरण्याआधीच पैसे भरावे लागतील अशी योजना आणली आहे. त्याकरीता देशभरातील सर्व विजेची मीटर बदलून त्याऐवजी स्मार्ट मीटर बसवण्यात येणार आहेत. सर्व विद्युत वितरण कंपन्यांना ही स्मार्ट मीटर बसवणे बंधनकारक करण्यात आले आहे. ही स्मार्ट मीटर नक्की आहेत तरी कशी, त्याचा ग्राहकांना काय फायदा, त्यामुळे विजेची बचत होणार का, पैसे संपले की लगेच विद्युतपुरवठा खंडीत होणार का असे अनेक प्रश्न यानिमित्ताने पुढे आले आहेत.

स्मार्ट मीटर म्हणजे काय ?

सध्याच्या विजेच्या मीटरचा अत्याधुनिक प्रकार म्हणजे स्मार्ट मीटर. आपण किती वीज वापरली त्याचे वाचन दर महिन्याला वीज कंपनी करते व त्यानुसार ग्राहकाला विजेची देयके पाठवली जातात. पण स्मार्ट मीटरमध्ये आपण किती वीज वापरली याची माहिती ग्राहकाला आपल्या मोबाइलमध्ये कुठूनही, केव्हाही पाहता येणार आहेत. तसेच वीजवापरासाठीचे पैसेही कुठूनही, कधीही भरता येणार आहेत. त्यामुळे ग्राहकाला आपला वीजवापर कमी-जास्त करता येईल किंवा विजेच्या वापराबाबत काही त्रुटी आढळल्यास त्याबाबत तत्काळ तक्रार करता येणार आहे.

ही स्मार्ट मीटर कधीपासून वापरात येणार?

केंद्र सरकारने ‘रिवॅम्प्ड डिस्ट्रीब्युशन सेक्टर स्कीम’ (आरडीएसएस) या प्रकल्पांतर्गत संपूर्ण देशभरातील कोट्यवधी वीज मीटर बदलण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. देशभरातील विद्युतपुरवठा करणाऱ्या सर्व कंपन्यांना आपल्या ग्राहकांची वीज मीटर बदलावी लागणार आहेत व त्याचे काम सर्व शहरे, गावांमध्ये सुरू झाले आहे. मुंबईत बेस्ट, टाटा, अदानी, एमएसईबी या कंपन्यांनी आपली वीज मीटर बदलण्यास सुरुवात केली आहे. या कामासाठी सरकारी वीज वितरण कंपन्यांना केंद्र सरकार अनुदानही देणार आहे. २०२५ पर्यंत देशभरातील सगळे मीटर बदलण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. आणखी एका वर्षानंतर वीजवापराची पारंपरिक पद्धत पूर्णतः नामशेष होणार आहे.

स्मार्ट मीटर कसे काम करते?

मोबाइलच्या धर्तीवरच ग्राहकांना विजेसाठी रिचार्ज करावे लागणार आहे. विजेचा वापर जसा वाढेल, तसे रिचार्जचे पैसे संपत जातील. किती वीज वापरली व किती पैसे उरले याची माहिती ग्राहकाला केव्हाही मोबाइलवरील ॲपमध्ये बघता येईल. प्रीपेड स्मार्ट मीटरमध्ये ग्राहकाने भरलेले पैसे संपले की वीजपुरवठा खंडित होईल. पण ग्राहकांना त्यांच्या मोबाइलवर वीजवापराची आणि किती पैसे उरले याची माहिती आधीच मिळेल आणि नव्याने पैसे भरणे सुलभ होईल. घरबसल्या मोबाइलवरून ऑनलाइन पैसे भरण्याचीही सुविधा आहे. ग्राहकाचे पैसे संपत आल्यावर त्याला वितरण कंपनीकडून मोबाइलवर संदेश पाठविला जाईल.

पैसे संपले की लगेच वीजपुरवठा खंडित होणार का ?

एखाद्या ग्राहकाने विजेसाठी भरलेले पैसे मध्यरात्री संपले, तर अचानक रात्री वीजपुरवठा बंद होणार नाही. सायंकाळी सहा ते सकाळी दहा या वेळेत पैसे संपले तरी वीजपुरवठा चालू राहील. संबंधित ग्राहकाने दुसऱ्या दिवशी सकाळी दहापर्यंत पैसे भरून वीजपुरवठा चालू ठेवायचा. त्यामधून वापरलेल्या विजेचे पैसे वजा होतील, अशी सुविधा या मीटरमध्ये आहे.

या स्मार्ट मीटरला विरोध का?
स्मार्ट मीटर या संकल्पनेला मुंबईत राजकीय पक्षांकडून विरोध होऊ लागला आहे. मुंबईत शहर भागात बेस्टतर्फे विद्युतपुरवठा केला जातो. बेस्टचे साडेदहा लाख ग्राहक मुंबईत असून त्यांचे वीज मीटर बदलण्याचे १३०० कोटी रुपयांचे काम अदानी यांच्या कंपनीला देण्यात आल्यामुळे राजकीय विरोध होत आहे. तसेच या स्मार्ट मीटरच्या आडून बेस्टचे खासगीकरण होत असल्याचा आरोपही होऊ लागला आहे. स्मार्ट मीटरमुळे विद्युत विभागातील अनेक कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जातील का अशीही भीती व्यक्त केली जात आहे. प्रीपेड पद्धत ही गरीब वर्गाला परवडणारी नाही. त्यामुळे हातावर पोट असलेले अचानक वीज गेली तर तातडीने पैसे कसे भरतील अशीही शंका उपस्थित केली जात आहे.

विजेचे बिल वाढणार का?
महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने (एमईआरसी) ठरवून दिल्यानुसारच विजेचे दर राहणार आहेत. सुरुवातीला वीज ग्राहकांना पोस्ट पेड आणि प्रीपेड असे दोन पर्याय असतील. त्यात प्रीपेडचा पर्याय स्वीकारणाऱ्यांना दोन टक्के सवलत दिली जाणार असल्याचे बेस्टने जाहीर केले आहे. स्मार्ट मीटरमुळे वाचन अचूक होईल, असा दावा केला जात आहे. त्यामुळे युनिट वाढतील अशी भीती व्यक्त केली जात आहे. मात्र मानवी हस्तक्षेप कमी झाल्यामुळे आणि वीज वापरावर नियंत्रण मिळवता येत असल्यामुळे वीज वापर कमी होईल, असा दावा वितरण कंपन्यात करीत आहेत.

स्मार्ट मीटरचे फायदे काय?
या क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते स्मार्ट मीटरमुळे ग्राहकांबरोबरच विद्युत वितरण कंपन्याचा फायदा होणार आहे. वीज चोरीचे प्रकार कमी होतील किंवा ते ताबडतोब लक्षात येतील. तसेच विजेची बिले न भरणाऱ्यांमुळे विजेची थकबाकी वाढत जाते व वितरण कंपन्या तोट्यात जातात. नक्की किती वीज पुरवठा करावा लागतो याचा अचूक अंदाज नसल्यामुळे विजपुरवठा कंपन्या मोठ्या प्रमाणावर वीज खरेदी करतात, ते टाळता येणार आहे. मुंबईत अनेकदा इमारती पुनर्विकासासाठी पाडल्या की त्यातील वीज ग्राहकांचा पत्ता नसतो. त्यांची विजेची थकबाकी वाढत जाते. अशा घटनाही टाळता येणार आहेत.

About विश्व भारत

Check Also

घोड़ी चढ़ने का समय नजदिक : राहुल गांधी और प्रणिती शिंदे का 17 या 22 नवंबर को विवाह

देश के सबसे चर्चित नेता राहुल गांधी की तिथि लगभग तय होगई है । संभवतया …

नेशनल हेराल्ड मामले में राहुल और सोनिया गांधी के खिलाफ मामला क्या है?

नेशनल हेराल्ड मामले में राहुल और सोनिया गांधी के खिलाफ मामला क्या है? टेकचंद्र सनोडिया …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *