मकर संक्रात साजरी झाल्यानंतरही जागोजागी झाडांवर आणि इतर खांबावर मांजा अडकल्याने चिमुकल्या पक्ष्यांचे जीव जात आहेत. मकर संक्रातील नागपूरात पंतगोत्सवाचा जोर यंदाही मोठा होता. नायलॉन आणि चायनीज धारदार मांज्याने अजूनही देशात दुचाकीस्वारांचे प्राण जात असतात. मकरसंक्रात संपून एक महिना होत आला तरी जागोजागी अडकलेल्या मांज्याने अनेक पक्ष्यांनाही नाहक आपले प्राण गमवावे लागतात. अशा एका पोपटाला जीवनदान देण्यासाठी नागपूर मेट्रोने विशेष ट्रेन चालविण्याचा आर्श्चयचकीत करणारा प्रकार घडला आहे.
नागपूर मेट्रोच्या पिलरवर मंगळवारी एक पोपट अडकला होता. या पोपटाचा प्राण वाचविण्यासाठी स्पेशल मेटो चालविण्यात आली. मेट्रोच्या ट्रॅकवर चालत जाऊन मांजात पाय गुंतलेल्या या पोपटाला एका पक्षी प्रेमी तरुणाच्या मदतीने कर्मचाऱ्यांनी वाचविले. या मांज्याने जखमी झालेल्या पोपटावर ट्रान्झिट ट्रिटमेंट केंद्रात उपचार सुरू आहेत. सेमिनरी हिल्सवरील वनखात्याच्या ट्रान्झिट ट्रिटमेंट केंद्राच्या चमूने या पोपटाला जीवदान दिल्याने त्यांचे कौतूक होत आहे. पोपट अडकल्याची माहीती पक्षी प्रेमींनी फोन करून मेट्रो प्रशासनाला दिली. त्यानंतर मेट्रो कर्मचाऱ्यांनी वरिष्ठांशी संपर्क साधला. त्यानंतर मेट्रोचे संचलन थांबवून मांज्यात अडकलेल्या पोपटाला वाचविण्याचे ऑपरेशन सुरु करण्यात आले असे महामेट्रोच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.