2024 लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी गृहशहर आणि स्वग्राम असलेल्या पोलीस, महसूल अधिकाऱ्यांची बदली करण्याचे स्पष्ट निर्देश निवडणूक आयोगाने दिले होते. तरीही नागपूर हे गृहशहर असलेले सायबर क्राईम व आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अर्चित चांडक यांची बदली झालेली नाही.
तसेच काही महसूल अधिकाऱ्यांचाही नागपूर हा गृह जिल्हा आहे. तरीही बदली न झाल्याने निवडणुकीवर परिणाम होऊ शकतो, असा दावा करणारी तक्रार अखिल भारत हिंदू महासभेचे राष्ट्रीय प्रचारक मोहन कारेमोरे यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे.
तर, बहुजन वंचित आघाडीचे पूर्व विदर्भ संयोजक प्रफुल्ल माणके यांनी थेट निवडणूक आयोगाकडे लेखी तक्रार केली आहे.
गृहशहर असलेले अनेक पोलीस अधिकारी बदलीस पात्र असूनही ‘साईड पोस्टिंग’च्या नावाखाली बदलीपासून वाचले. त्यांची नावे पोलीस आयुक्तांनी पोलीस महासंचालक कार्यालयात पाठविलीच नाहीत. पोलीस उपायुक्त अर्चित चांडक यांचे नागपूर हे गृहशहर आहे. त्यांचे शिक्षणही नागपुरातच झाले. त्यामुळे त्यांचे समाजात आणि राजकीय पक्षांसोबत संबंध असल्याची शक्यता नाकारता येत नाही.
चांडक हे पोलीस उपायुक्त असून त्यांच्या अधिनस्थ जवळपास 500 पोलीस अधिकारी आणि कर्मचारी आहेत. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत पोलीस उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यामुळे स्थानिक राजकीय स्थितीवर परिणाम पडू शकतो. ही बाब लक्षात घेऊन व लोकसभा निवडणूक पारदर्शक आणि कोणत्याही दबावाशिवाय पार पडावी यासाठी गृहशह चांडक यांची तत्काळ बदली व्हावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने केली आहे.