शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्या यंदा रखडल्या आहेत. मे महिन्यात होणाऱ्या बदल्या जून महिना अर्धा होत आला तरी काही हालचाल दिसत नाही. मुलांचे शैक्षणिक वर्ष चार दिवसांत सुरू होईल. बदलीच्या ठिकाणी जाणार कधी, राहण्याची व्यवस्था होणार कधी, मुलांचा शैक्षणिक प्रवेश घेणार कधी, ही रुखरुख आता कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या मनात आहे.
रखडलेल्या बदल्या शासनाने किमान या आठवड्यात तरी कराव्यात, अशी मागणी महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाने केली आहे अन्यथा किमान विनंती बदल्या तरी कराव्यात, असेही त्यांचे म्हणणे आहे. मे महिना हा सरकारी नोकरीतील बदल्यांचा महिना म्हणून ओळखला जातो. साधारण मार्च महिन्यानंतर मे महिन्यापर्यंत राज्यातील सुमारे ४० हजार शासकीय कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या बदल्या होत असतात. यासाठी मोठ्या प्रमाणावर शिफारशी आणि पत्रे मंत्रालयात येतात. आमदार, खासदार तसेच लोकप्रतिनिधींकडून संबंधित कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या बदल्यांसाठी शिफारस पत्रे देण्यात आली; परंतु यंदा लोकसभेची आचारसंहिता ४५ दिवस लागली. ती संपते न संपते तोवर कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लागल्याने त्याची आचारसंहिता लागली. या सर्व घडामोडींमध्ये शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्या रखडल्या आहेत.
मे महिन्यात बदल्या झाल्यास बदलीच्या ठिकाणी हजर होणे, राहण्याची व्यवस्था आणि मुलांच्या शैक्षणिक प्रवेश घेण्यासाठी अवधी मिळतो. नवीन शैक्षणिक वर्षे सुरू होण्यास चार दिवस बाकी आहेत, तरी अजून शासनाने बदल्यांचा मेमो काढलेला नाही. त्यामुळे अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड रुखरुख आहे.
४० हजार कर्मचाऱ्यांचा होणार बदल्या
राज्य शासनाचे राज्यात सुमारे एक लाख वीस हजार कर्मचारी कार्यरत आहेत. यापैकी ३० टक्के कर्मचाऱ्यांच्या दरवर्षी बदल्या होतात म्हणजेच ४० हजार कर्मचाऱ्यांच्या बदल्या होतात. या नियमित होणाऱ्या बदलांनाही यंदा ब्रेक लागल्याने कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची अवस्था आहे.