Breaking News

नागपुरात आयुष्याला कंटाळून वृद्ध पती-पत्नीने घेतला गळफास : वाचा

पाचही मुलींचे लग्न झाल्यानंतर घरात एकट्या पडलेल्या वृद्ध दाम्पत्याचा सांभाळ करण्यास कुणीही नव्हते. त्यामुळे आयुष्याला कंटाळून वयोवृद्ध दाम्पत्याने मुलीच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही दुर्दैवी घटना शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास उघडकीस आली. श्रीराम बापूराव कटरे (८५) आणि शकुंतला श्रीरामजी कटरे (८२, रा. अमरावती) असे मृत दाम्पत्याचे नाव आहे.

 

श्रीराम कटरे हे अमरावती शहरातील यशोदानगरात पत्नी शकुंतला यांच्यासोबत राहते होते. त्यांना मुलगा नसून पाच मुली आहेत. ते खासगी काम करीत होते तर शकुंतलाही त्यांना काम करुन आर्थिक हातभार लावत होत्या. त्यांच्या पाचही मुलींचे लग्न झाल्यानंतर कटरे दाम्पत्य एकाकी पडले होते. वयाचे ८० पेक्षा जास्त वर्षे पार पडल्यामुळे दोघांचेही आरोग्य व्यवस्थित नव्हते. ते स्वत: घरातील कामे करण्याच्या किंवा औषधोपचारही घेण्याच्या स्थितीत नव्हते.

 

मुलगा नसल्यामुळे घरात कुणीही सांभाळ करण्यास नसल्याची त्यांना खंत होती. त्यामुळे कटरे दाम्पत्य आयुष्याला कंटाळले होते. श्रीराम आणि शकुंतला हे पाचपैकी कोणत्याही विवाहित मुलींच्या घरी जाऊन राहत होते. सध्या त्यांचा मुलीच सांभाळ करीत होत्या. २६ मे रोजी पती-पत्नी हे नागपुरातील चंदननगरात राहणारी विधवा मुलगी ज्योती श्रीराम पारधी (६५) यांच्याकडे राहायला आले होते.

 

गेल्या महिन्याभरापासून त्यांचा सांभाळ आणि औषधोपचार ज्योती या करीत होत्या. ‘मुलीच्या घरी किती दिवस राहायचे, मुली स्वत:चा संसार सोडून आपला सांभाळ करण्यात व्यस्त असतात. मुलींना किती त्रास द्यायचा.’ असे श्रीराम वारंवार नातेवाईकांकडे बोलून दाखवत होते. आयुष्याला कंटाळलेले कटरे दाम्पत्य या बाबतीत नेहमी आपआपसांत चर्चा करून काहीतरी निर्णय घेऊ, अशा भूमिकेत होते. शुक्रवारी रात्री ज्योती यांच्या पुतण्याच्या मुलाचा पहिला वाढदिवस होता. त्यामुळे सर्व कुटुंब अलंकारनगर येथे जाणार होते.

 

मात्र, श्रीराम आणि शकुंतला यांनी कार्यक्रमास येण्यास नकार दिला. सर्व कुटुंब वाढदिवसाच्या कार्यक्रमाला गेले असता श्रीराम यांनी खोलीत तर शकुंतला यांनी स्वयंपाक घरात साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. मध्यरात्रीच्या सुमारास कार्यक्रम आटोपून ज्योती या परत आल्या असता त्यांना आई-वडिल गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. त्यांनी इमामवाडा पोलिसांना माहिती दिली. या प्रकरणी इमामवाडा पोलिसांनी तुर्तास आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून तपास सुरु केला आहे.

आपसांत घेतला टोकाचा निर्णय

किती दिवस मुलींकडे राहायचे आणि कुणावर किती दिवस ओझे बनून राहायचे, असा विचार कटरे दाम्पत्यांनी केला. त्यामुळे त्यांनी आत्महत्या करण्याचा टोकाचा निर्णय घेतला. कुटुबीय वाढदिवसाच्या कार्यक्रमाला गेल्यानंतर दोघांनी घरात गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. या घटनेमुळे परीसरात हळहळ व्यक्त होत आहे.

About विश्व भारत

Check Also

पुलिस ने रेप पीड़िता को 15 दिन घुमाया : SP से शिकायत होते मचा हड़कंप

पुलिस ने रेप पीड़िता को 15 दिन घुमाया : SP से शिकायत होते मचा हड़कंप …

गर्म पानी में झुलसने से मासूम की मौत : परिजन सदमे में

गर्म पानी में झुलसने से मासूम की मौत, परिजन सदमे में टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *