Breaking News

२५० पक्ष मैदानात : उमेदवारीसाठी अखेरचे दोन दिवस

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अखेरचे दोन दिवस शिल्लक असतानाही महायुती आणि महाविकास आघाडीतील घोळ संपलेला नाही. दोन्ही आघाड्यांतील सर्वच पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर बंडखोरी झाली आहे. बंडोबांना शांत करण्याची मोहीम पक्षांच्या नेत्यांना हाती घ्यावी लागली आहे. महायुतीतील जागावाटपाचा तिढा कायम असतानाच महाविकास आघाडीतील सुंदोपसुंदीही चव्हाट्यावर आली आहे. २५० छोटे-मोठे राजकीय पक्ष निवडणूक रिंगणात आहेत.

 

उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मंगळवारपर्यंत मुदत असली तरी महायुती आणि महाविकास आघाडीत अजूनही जागावाटपाचा घोळ सुरू आहे. महायुतीतील तिढा सोडविण्याकरिता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात बराच खल झाला. भाजप, शिवसेना (शिंदे), राष्ट्रवादी (अजित पवार) हे तीन पक्ष किती नेमक्या जागा लढणार हे अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. महाविकास आघाडीतही जागावाटपाचा घोळ सुरूच आहे. शिवसेना (ठाकरे) आणि काँग्रेसमधील वाद मिटण्याची लक्षणे नाहीत. परिणामी महाविकास आघाडीत काही जागांवर मैत्रीपूर्ण लढतींची शक्यता निर्माण झाली आहे. काँग्रेसने दावा केलेल्या मतदारसंघांमध्ये शिवसेनेने उमेदवार जाहीर केल्याने काँग्रेसमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटली. काँग्रेस नेत्यांचा दिवसभर खल सुरू होता. सोमवारपर्यंत तोडगा न निघाल्यास मंगळवारी काही मतदारसंघांमध्ये शिवसेनेच्या विरोधात उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तयारी काँग्रेसने केली आहे. शिवसेनेच्या आडमुठ्या भूमिकेमुळे महाविकास आघाडीत तिढा निर्माण झाल्याचे काँग्रेस नेत्यांचे म्हणणे आहे. काँग्रेस आणि शिवसेनेतील वाद वाढला असताना राष्ट्रवादीचे (शरद पवार) नेते सारी मजा बघत आहेत. शरद पवार यांनी मध्यस्थी करावी, अशी काँग्रेस व शिवसेनेच्या नेत्यांची भूमिका आहे. भाजप नेते रावसाहेब दानवे यांच्या मुलाला भाजपने उमेदवारी दिली असताना मुलीने शिवसेनेत (शिंदे) प्रवेश केला. एकूणच इच्छुकांची संख्या लक्षात घेता सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांना सर्वांचे समाधान करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. सोमवार व मंगळवार हे दोन दिवस राजकीय घडामोडींच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उद्या, सोमवारी कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. या वेळी मोठ्या प्रमाणावर शक्तिप्रदर्शन केले जाणार आहे.

घालमेल आणि पक्षांतरे

मुदत संपत आल्याने उमेदवारी जाहीर न झालेल्या इच्छुकांमधील घालमेल वाढली आहे. उमेदवारी न मिळालेले अन्य पर्यायांचा विचार करीत आहेत. उमेदवारीसाठी दुसऱ्या पक्षाचा झेंडा हाती घेण्यासाठी सर्वच पक्षांमध्ये गर्दी वाढली आहे. भाजपकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता मावळल्याने दिवंगत आमदार राजेंद्र पटणी यांच्या मुलाने राष्ट्रवादीत (शरद पवार) प्रवेश केला. विविध पक्षांमधील इच्छुकांचा दिवसभर अशाच पद्धतीने प्रवास सुरू होता.

About विश्व भारत

Check Also

यूनिवर्सिटी में CM ममता बनर्जी के भाषण मे हंगामा

यूनिवर्सिटी में CM ममता बनर्जी के भाषण मे हंगामा टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट   …

सैकडों कांग्रेसी नेताओं का भाजपा मे शामिल होना शुरु

सैकडों कांग्रेसी नेताओं का भाजपा मे शामिल होना शुरु टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट   …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *