Breaking News

अंबानींच्या घराबाहेर सापडलेल्या कारच्या मालकाचा संशयास्पद मृत्यू

Advertisements
  • एनआयएकडे तपास द्या

  • सभागृहात भाजपची जोरदार मागणी

  • सचिन वाझे संशयाच्या भोव-यात

  • दोन्ही गाड्या ठाण्यातील

  • एटीएसकडे सोपवला तपास

मुंबई (प्रतिनिधी) : रिलायंस इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील एंटीलियाबाहेर स्फोटके असलेली स्कॉर्पियो गाडी सापडली होती. या गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याचे शुक्रवारी उघडकीस आले. या प्रकरणावर आक्रमक झालेल्या देवेंद्र फडणवीस यांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपविण्यात यावा, अशी मागणी केली, तर पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या या प्रकरणातील भूमिकेवरही संशय व्यक्त केला. यावर सभागृहात जोरदार खडाजंगी झाली. त्यानंतर या प्रकरणाचा तपास एटीएसकडे सोपवण्यात येणार असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी जाहीर केले.

Advertisements

देवेंद्र फडणवीस यांनी मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर पार्क केलेल्या स्फोटकांनी भरलेल्या गाडीच्या प्रकरणावर अनेक प्रश्न उपस्थित केले. ते म्हणाले की, या घटनेतील दोन्ही गाड्या ठाण्यातून आल्या. घटनास्थळावर सर्वात आधी मुंबई पोलिसांचे सचिन वाझे पोहोचले. कोणीही पोहोचण्याच्या आधी ते आले. मग सचिन वाझेंना या प्रकरणात तपास अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आलं. तीन दिवसांपूर्वी त्यांच्याऐवजी एका एसीपींकडे तपास सोपवला. सचिन वाझेंना का काढलं? हे समजलं नाही. पण यात योगायोग आहे. गाडी मालकाचा एका मोबाईल क्रमांकावर जूनपासून अनेकवेळा संवाद झाला आहे. हा मोबाईल क्रमांकही सचिन हिंदुराव वाझे या नावावर आहे. ज्या दिवशी ही गाडी ठाण्याला बंद पडल्यानंतर गाडी मालक ओला घेऊन क्रॉफर्ड मार्केटला गेला. तिथे पोलीस आयुक्तांचं आॅफिस आहे. तिथे तो एका व्यक्तीला भेटला. ती व्यक्ती कोण? असे अनेक योगायोग या प्रकरणात आहेत. हे योगायोग काय आहेत, याची चौकशी एनआयएने करावी, अशी मागणी त्यांनी केली.

Advertisements

दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी मनसुख हिरेन यांच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त केला असून हात बांधून कोणी आत्महत्या करू शकत नाही, असं सांगत हिरेन यांच्या खुनाचा संशय व्यक्त केला आहे. यावर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्र, मुंबई पोलीस तपास करण्यासाठी सक्षम असल्याचं त्यांनी म्हटलं. फडणवीसांनी यावेळी पोलिसांच्या आणि गृहमंत्र्यांच्या बोलण्यात विसंगती असल्याचा आरोप केला. हे कोणाला वाचवण्यासाठी सुरू आहे? अशी विचारणादेखील त्यांनी केली.

अनिल देशमुख यांनी यावेळी फडणवीसांना त्यांच्याकडे असणारी सर्व माहिती आपल्याकडे द्यावी, असं म्हटलं. तर सचिन वाझे यांनी अर्णब गोस्वामीला आतमध्ये टाकलं म्हणून तुमचा राग आहे का त्यांच्यावर? अशी विचारणा केली. यावरून भाजपचे सदस्य आक्रमक झाले. या प्रकरणात सरकार कोणाला वाचविण्याचा प्रयत्न करत आहे, ते स्पष्ट करण्याची मागणी केली.

ठाण्याच्या खाडीत सापडला मृतदेह

अंबानी यांच्या दक्षिण मुंबईतील घराजवळ सापडलेल्या स्कॉर्पियो गाडीचा मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह मुंब्रा रेती बंदर येथे शुक्रवारी दुपारी सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी ठाणे पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे. मनसुख हिरेन यांनी खाडीत उडी मारून आत्महत्या केली असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकं भरलेली कार सापडली होती. ही कार मनसुख हिरेन यांची असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यावेळी त्यांनी सदर कार आपण कुटुंबासाठी विकत घेतली असून कारचे स्टेअरिंग लॉक झाल्याने ती रस्त्यावर उभी करून ठेवली होती. तेथून ही कार चोरी गेल्याचे म्हटले होते. दरम्यान हिरेन यांनी अंबानींच्या घरासमोर कार सापडण्याच्या दोन दिवस आधीच कार चोरी गेल्याची तक्रार पोलिसांत दिली होती. संशयित कारचे मालक म्हणून हिरेन यांचा जबाब पोलिसांनी घेतला होता. त्यानंतर काही प्रसिद्धी माध्यमांशीही मनसुख हिरेन यांनी संवाद साधला होता.

मनसुख हिरेन हे ठाण्यातील नौपाडा परिसरात वास्तव्याला होते. मनसुख बेपत्ता असल्याची तक्रार त्यांच्या कुटुंबीयांनी नौपाडा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आल्यानंतर सकाळी दहाच्या सुमारास त्यांचा मृतदेह आढळून आला. मनसुख हिरेन याचा मृतदेह मुंब्रा रेती बंदर येथे सापडल्याने हे सर्व प्रकरण आता गंभीर वळणावर पोहचले आहे. गेल्याच आठवड्यात हिरेन यांनी स्वत: पोलिसांसमोर हजर राहत आपली गाडी हरवली असल्याची तक्रार पोलीसांत दाखल केली होती. दरम्यान शुक्रवारी दुपारी हिरेन यांच्या कुटूंबीयांनी ते बेपत्ता झाल्याची तक्रार नौपाडा पोलीसांत नोंदवली होती. मात्र काही तासांअगोदरच मनसुख हिरेन याचा मृतदेह रेती बंदर येथील खाडीत सापडला आहे. त्यामुळे आता या प्रकरणाला वेगळे वळण आले आहे.

गृहमंत्री गंभीर नाहीत: मुनगंटीवार

सचिन वाझे यांनी अर्णब गोस्वामीला अटक केली म्हणून त्याचं नाव घेतलं जाणं असं म्हणणं हे राजकीय, संविधानिक पाप आहे. नियमांचं पुस्तक पाहिलंत, तर विरोधी पक्ष नेतेपद मुख्यमंत्रीपदाच्या तोडीस तोड मानलं जातं. इतकी महत्त्वाची माहिती दिल्यानंतर गृहमंत्र्यांनी गांभीर्यानं उत्तर दिलं पाहिजे. एनआयएला चौकशी देण्यामागे कसली भीती आहे, अशी विचारणा सुधीर मुनगंटीवार यांनी केली.

Advertisements

About Vishwbharat

Check Also

राजस्थान में बीजेपी ने वसुंधरा को मुख्यमंत्री नहीं बनाया तो इन नामों पर हो सकता है विचार

राजस्थान में बीजेपी ने वसुंधरा को मुख्यमंत्री नहीं बनाया तो इन नामों पर हो सकता …

पनवती कोण? काँग्रेसला आता कळले असेल : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला जे अभूतपूर्व यश मिळाले ते …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *