नागपूर शहरातील उद्यानांची स्थिती योग्य असल्याचे सांगणाऱ्या नासुप्रच्या दाव्यांची महापालिकेच्या समितीने पोलखोल केली होती. तरीही, अजूनपर्यंत उद्याने दुरुस्त करण्यात आलेले नाही.
वर्धा मार्गांवरील पर्यावरणनगर मधील उद्यानाचा वाली कोण? असा प्रश्न आहे. जेवण उद्यान शेवटच्या घटका मोजत आहे का? असे चित्र आहे. येथे साप आणि अन्य लहान-मोठे धोकादायक जीव दिसून आले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पर्यावरणनगरातील उद्यानाची जबाबदारी महापालिका की नागपूर सुधार प्रन्यासची, यावरूनही वाद आहे. महापालिकेला हस्तांतरित केलेल्या शहरातील ४४ उद्यानांपैकी केवळ तीन योग्य स्थितीत आहेत. उर्वरित सर्व उद्यानांमध्ये मूलभूत सोयी-सुविधांचा अभाव असल्याचे शहरातील स्थानिक नगरसेवकांनी केलेल्या पाहणी अहवालातून पुढे आले आहे.
उद्यानांच्या स्थितीसंदर्भातील अहवाल गुरुवारी महापौर दयाशंकर तिवारी यांना सादर करण्यात आला होता. स्थापत्य समितीचे सभापती राजेंद्र सोनकुसरे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त करण्यात आली होती. नासुप्रच्या २० उद्यानांची स्थिती साधारण आहे, तर २१ उद्यानांचा पूर्णपणे कायापालट आवश्यक असल्याचे या समितीने सुचवले आहे. नासुप्रकडे असलेल्या अनेक उद्यानांमध्ये पिण्याच्या पाण्याची, प्रसाधनगृहांची व सांडपाणी वाहून नेण्याची व्यवस्था नसल्याचे पाहणीत आढळले. याशिवाय, अनेक उद्यानांना संरक्षक भिंती नाहीत, तर खेळणी व ग्रीन जिमची दुरवस्था असल्याचे अहवालात नोंदवण्यात आले.
शहरात महापालिका व नासुप्रची एकूण १७९ उद्याने आहेत. महापालिकेच्या उद्यान विभागाकडे मनुष्यबळाचा अभाव असल्याने त्यांच्याकडील उद्यानांची देखभाल करताना तारेवरची कसरत करावी लागते. इतकेच नव्हे, तर अर्थसंकल्पात यासाठी अत्यंत तोकडी तरतूद आहे. त्यात आता नासुप्रची उद्यानेही महापालिकेकडे आली आहेत.
उद्यानांच्या सुरक्षाभिंती बांधाव्यात, वॉकिंग ट्रॅक नव्याने बांधावेत, पावसाचे पाणी वाहून नेणाऱ्या वाहिन्या, जलवाहिन्या टाकाव्यात, सुरक्षारक्षकांच्या खोल्यांची पुनर्बांधणी करावी, प्रसाधनगृहांची निर्मिती करावी, खेळणी, ग्रीन जिम दुरुस्तीबरोबर इतर आवश्यक सोयीसुविधांची निर्मिती करावी असेही समितीने अहवालात सुचवले आहे.
उद्याने महापालिकेकडे हस्तांतरित करण्याच्या सूचना मिळाल्यानंतर नासुप्रने ५ जुलै २०२०पासून त्यांची देखभाल थांबवली होती. तसेच देखभाल करणाऱ्यांची देयकेही थांबवण्यात आली होती. त्यामुळे ज्या वस्त्यांमध्ये नासुप्रची उद्याने आहेत, त्या भागांतील नागरिकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले होते. उद्यानांच्या दुरवस्थेचा रोष नगरसेवकांना सहन करावा लागत होता. त्यामुळे नगरसेवकांनी गेल्यावर्षी सप्टेंबरमध्ये झालेल्या महासभेत हा मुद्दा उपस्थित केला होता. नासुप्रच (एनआयटी) या बेहालसाठी जबाबदार असल्याचा ठपका ठेवण्यात आला होता.
उद्यानाकडे लक्ष द्या, मागणी
महापालिका आणि नागपूर सुधार प्रन्यासने लवकर उद्यानाची देखभाल दुरुस्ती करावी, अशी मागणी अलका कारेमोरे, निर्मला दूनेदार,मालती पत्तीवार, किरण अग्रवाल,वर्षा लांजेवार लता देशमुख, भाग्यश्री पुराणिक, शिला खाप्रड़े,सुरेखा वानखेड़े,निर्मला चारमोड, ज्योती पीपळे, सना श्रीपात, नलिनी वडी,सविता सदैवर्ते,विशाल टुले आदींनी केली आहे.