अभिनेत्री मलायका अरोरा व अर्जुन कपूर यांचे काही दिवसांपूर्वी ब्रेकअप झालं. दोघांनीही ते सध्या सिंगल असल्याचं म्हटलंय. त्यानंतर आता अभिनेत्री मल्लिका शेरावतनेही ब्रेकअप झाल्याची माहिती दिली आहे. ४८ वर्षीय मल्लिकाचं फ्रेंच बॉयफ्रेंडबरोबरचं नातं तुटलं आहे. मल्लिका घटस्फोटित आहे. तिने २००० मध्ये करण सिंग गिलशी लग्न केलं होतं, मात्र वर्षभरातच तिचा घटस्फोट झाला होता.
मल्लिका शेरावत व तिचा फ्रेंच बॉयफ्रेंड सिरिल ऑक्सेनफन्सबरोबर यांचं ब्रेकअप झालं आहे. दोघेही गेल्या अनेक वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते, मात्र आता त्यांचं नातं संपुष्टात आलं आहे. मल्लिकाने तिच्या ब्रेकअपबाबत जास्त बोलण्यास नकार दिला आहे.
एका मुलाखतीत, मल्लिका शेरावतने सांगितलं की सध्या ती तिच्या अधिक चांगल्या व मनोरंजक भूमिकांच्या शोधात आहे. तसेच ती वैयक्तिक आयुष्यात योग्य व्यक्तीचा शोध घेत आहे. आजच्या काळात योग्य जोडीदार मिळणं खूप कठीण आहे, असं म्हणत मल्लिकाने ती सिंगल असल्याचं स्पष्ट केलं.
लग्नाबद्दल मल्लिकाने मांडलं मत
मल्लिका शेरावतला विचारण्यात आलं की ती सिंगल आहे का? तेव्हा अभिनेत्रीने होकार दिला. “मी सिंगल आहे”, असं ती म्हणाली. मल्लिका फ्रेंच नागरिक सिरिल ऑक्सेनफन्सला डेट करत होती. त्याचा उल्लेख केल्यावर ती म्हणाली, “आमचं ब्रेकअप झालं आहे. मला याबद्दल बोलायचं नाही.” मल्लिकाने यावेळी लग्नाबाबत आपलं मत मांडलं. “मी याच्या बाजूने नाही आणि विरोधातही नाही. दोन लोकांना काय हवं आहे यावर ते अवलंबून आहे,” असं मल्लिका म्हणाली.
चांगला जोडीदार मिळणं कठीण – मल्लिका
एखादी व्यक्ती जर आपला वेळ आणि भावना गुंतवत असेल तर तो जोडीदार त्याच्यासाठी पात्र असला पाहिजे, असं मल्लिकाला वाटतं. “इतकी वर्षे झाली, मी अजूनही वाट पाहत आहे. कदाचित मी खूप अपेक्षा करत आहे,” असं मल्लिका म्हणाली.
मल्लिका शेरावतच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास ती शेवटची ‘विकी विद्या का वो वाला व्हिडीओ’ या चित्रपटात दिसली होती. राजकुमार राव व तृप्ती डिमरी यात मुख्य भूमिकेत होते.