Advertisements
विकृत मानसिकतेने गाठला कळस….!
(शेत रक्षणासाठीचे कुंपण केले उदवस्त, पोलीसात तक्रार.)
कोरपना (ता.प्र.):-
कोरपना तालुक्यातील नांदा येथील प्रभु रामचंद्र विद्यालयाचे प्राचार्य अनील मुसळे यांनी नुकतेच नांदा-बिबी लगत असलेल्या स्वतःच्या मालकीच्या शेतात जनावरांपासून होणाऱ्या नुकसानीच्या बचावासाठी सिमेंट पोल उभे करून तारेचे कुंपण केले होते.मात्र नैसर्गिक नाल्याचा प्रवाह बदलून पावसाळ्याचे पाणी वस्तीत शिरत असल्याने व शिवधुऱ्याची जागा न सोडता सदर काम होत आहे.तसेच यासाठी शासनाची कुठलीही परवानगी घेण्यात आली नसल्याचे आरोप करत बिबी ग्रामपंचायतचे सदस्य नरेंद्र अल्ली यांनी तहसीलदार कोरपना यांच्याकडे निवेदनाद्वारे तक्रार करून सदर काम तातडीने थांबवून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली होती.या प्रकरणाची चौकशी सुरू असतांनाच १ जुलै रोजी रात्री अंदाजे १० च्या सुमारास अचानक बिबी ग्रा.पं. सदस्य अल्ली यांनी दारूच्या नशेत धिंगाणा घालत शेत संरक्षणासाठी केलेले कुंपण उदवस्त केले.त्याचबरोबर आर्थिक नुकसान व जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार प्राचार्य अनील मुसळे यांनी गडचांदूर पोलीस स्टेशनला दिली.गुन्हा नोंदविण्यात आला असून तपास सुरू असल्याची माहिती आहे.
प्राचार्य अनील मुसळे हे काँग्रेस पक्षाच्या सेवादलाचे कार्यकर्ते असून त्यांनी पक्षाकडून चंद्रपूर नगरपालिका निवडणूक ही लढली आहे.याप्रकरणी प्रा.मुसळे हे जिल्ह्यातील पक्षाच्या वरिष्ठांकडे तक्रार करणार असल्याची माहिती आहे.तर बिबी ग्रा.पं.चे सदस्य नरेंद्र अल्ली हे काँग्रेस पक्षाकडूनच ग्रा.पं.सदस्य म्हणून निवडून आल्याने येणाऱ्या ग्रा.पं. निवडणूकीत स्थानिक राजकिय वातावरण चिघळण्याची चिन्हे दिसत असल्याचे बोलले जात आहे.
“मुसळे यांनी समाज माध्यमावर दिली प्रतिक्रिया”
गेल्या १ जुलै रोजी रात्रीच्या सुमारास (अंदाजे १० वाजता)बिबी ग्रा.पं.सदस्यांनी दारू पिऊन धिंगाणा घालत माझ्या शेतातील जवळपास २५ पोल तोडून आर्थिक नुकसान केले.सदर बाब काँग्रेसच्या संस्कृतीला शोभत नाही,कोणतीही लढाई कायदेशीर लढली पाहिजे.तो आपला हक्क आहे.परंतु आपण समाजाचे पुढारी म्हणून घेत असताना स्वतः दारू पिऊन गुंडगिरी करीत असाल तर ते काँग्रेस संस्कृतीला काळीमा फासणारी दुर्दैवी घटना आहे.आपण जनतेचे प्रतिनिधी आहो,ही बाब लक्षात ठेवली पाहिजे.मी स्वतः काँग्रेसकडून निवडणूक लढलो व इतरही पक्षात होतो,परंतू अशा वागणूकीमुळे सेवादालातून काँग्रेस कार्यकर्ता तयार व्हायचा तोच आता गुंडगिरीतून तयार होताना दिसत आहे.ही बाब निश्चितच धोक्याची सूचना देणारी आहे.वरिष्ठांनी अशा गुंड प्रवृत्तीच्या कार्यकर्यावर वचक ठेवून समाजसाठी विधायक कार्य करावे.माझे नुकसान झाले ते मी भरून काढीन पण पक्षाचे नुकसान होऊ नये,याची खबरदारी घ्यावी.अशा गुंडगिरीमुळे पक्ष वाढणार आहे काय ? असा प्रश्न प्रा.मुसळे यांनी पक्षाच्या वरिष्ठांना विचारला आहे.
“मी बिबी गावचा सदस्य असून एक जबाबदार सदस्य आहो.न्यायप्रक्रियेला मानतो म्हणूनच रितसरपणे तहसीलदार यांच्याकडे तक्रार केली आहे.जीवे मारण्याची धमकी ही पूर्णतः खोटी आहे.कुंपण पाडण्यात माझा काही संबंध नाही. त्या नाल्याची दिशा बदलल्यामुळे अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरण्याची शक्यता असल्याने मी जबाबदार सदस्य म्हणून न्यायाने लढत आहो.मी तक्रार केली म्हणून माझ्यावर कुंपण पाडल्याचा खोटा आरोप लावण्यात
येत आहे.”
“नरेंद्र अली ग्रामपंचायत सदस्य बिबी.”
Advertisements