– मोहन कारेमोरे
मुंबई : मंत्रिमंडळाच्या दुसऱ्या टप्प्यातील विस्ताराला ऑक्टोबर महिना उजाडण्याची शक्यता आहे. मंत्रीमंडळात स्थान न मिळालेल्या नाराजांना १५ सप्टेंबरपर्यंत मंत्री करण्याचा शब्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला आहे. पण, विस्ताराला होणारा विलंब लक्षात घेता नाराजी उघडपणे दिसण्याची शक्यता आहे.
शिंदे फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर ३८ दिवसांनी मंत्र्यांचा शपथविधी झाला. त्यात शिंदे गटातील काही आमदारांच्या नावावर फुली मारली गेल्याने अपक्षांसह बंडखोरांत धुसफूस असल्याचे दिसून आले. भाजपमध्येही फारशी वेगळी स्थिती नाही. या विस्तारानंतर नाराजांची समजूत काढताना १५ सप्टेंबरपर्यंत विस्तार करण्याचे सूतोवाच शिंदे गटातील वरिष्ठ नेत्यांनी केले होते. आपल्याकडील नाराजांना शब्द दिल्याप्रमाणे विस्तार करण्याची शिंदे गटाची तयारी असल्याचे बोलले जात आहे.तरी भाजपकडून अद्याप होकार मिळाला नसल्याचे सांगण्यात येत आहे.