मुंबई : जून ते ऑगस्टपर्यंत झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित शेतकऱ्यांसाठी तब्बल ३ हजार ५०१ कोटीच्या मदतीची घोषणा सरकारने गुरुवारी केली. त्यानुसार या मदतीचे वाटप तातडीने सुरू करून बाधितांच्या खात्यात पैसे जमा करण्याचे आदेश मदत आणि पुनर्वसन विभागाने दिले.
आकडेवारी
अतिवृष्टी आणि पुरामुळे राज्यातील एकूण २३ लाख ८१ हजार ९२० हेक्टर शेतीचे नुकसान झाले असून २५ लाख ९३ हजार शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा फटका बसला आहे. त्यातही विशेषत: विदर्भ आणि मराठवाडय़ातील १८ जिल्ह्यांना अतिवृष्टीचा मोठा फटका बसला होता. या जिल्ह्यातील एकूण ३२५ गावांतील १० हजार ८९४.९२ हेक्टर जमीन पुरामुळे खरडून किंवा वाहून गेली तर १२ हजार ७८८ हेक्टर जमिनीचे पुरामुळे नुकसान झाले. नैसर्गिक आपत्तीमध्ये बाधितांच्या मदतीत वाढ करण्याचा निर्णय सरकारने काही दिवसांपूर्वी घेतला होता. त्यानुसार जिरायत शेतीसाठी प्रति हेक्टरी १३ हजार ६०० रुपये, बागायत शेतीसाठी २७ हजार रुपये प्रति हेक्टर आणि बहुवार्षिक शेतीसाठी ३६ हजार रुपये प्रति हेक्टर मदतीची घोषणा करण्यात आली होती. तसेच ही मदत दोनऐवजी तीन हेक्टरच्या मर्यादेत देण्यात येणार आहे.
अशी आहे मदत
शेतकऱ्यांसाठीचा मदतीचा निधी सबंधित विभागीय आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आल्याचे उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले. ही मदत देताना केंद्र शासनाच्या नैसर्गिक आपत्तीच्या निकषांची पूर्तता करणाऱ्यांनाच द्यावी, तसेच राज्य सरकारने घोषित केल्याप्रमाणे मंडळामध्ये २४ तासांत ६५ मीलिमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली असल्यास आणि मंडळातील गावामध्ये ३३ टक्क्यांपेक्षा अधिक शेतपिकांचे नुकसान झाले असल्यास मदत द्यावी, तसेच ही मदत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट ऑनलाइन पद्धतीने जमा करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.