नागपूर : शासकीय बदल्या म्हटलं की, आर्थिक व्यवहार आलाच. त्यातच सार्वजनिक बांधकाम विभागातील (पीडब्लूडी) बदल्यांचा विषय समोर आल्यास सर्वांच्या भूवया उंचावतात. यंदा बदल्यांमध्ये पारदर्शकता न ठेवल्यास न्यायालयात याचिका दाखल करणार, असा इशारा अखिल भारत हिंदू महासभेचे राष्ट्रीय प्रचारक मोहन कारेमोरे यांनी दिला आहे.
एकाच ठिकाणी ठाण मांडून
‘पीडब्लूडी’मध्ये बऱ्याच वर्षांपासून एक अधिकारी एकाच पदावर वर्षांनवर्षे कार्यरत आहेत. तर काही अधिकारी पदोन्नती घेऊनही नागपूर सोडण्यास तयार नाहीत. चंद्रपूर, गडचिरोली सारख्या दुर्गम भागात बदलीला नकार देणाऱ्याचे प्रमाण अधिक आहे.
कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतरही गडचिरोली, चंद्रपूर येथील अधिकाऱ्यांना नागपूर किंवा अन्य ठिकाणी बदली करण्यास अडचणी तयार केल्या जातात. बदलीसाठी अर्ज देऊनही बदली न होत असल्याने अनेक कार्यकारी अभियंता, उपकार्यकारी अभियंत्यांमध्ये नाराजीचा सुर आहे.
मंत्रालयात लॉबीग
तर, नागपूर आणि अमरावती विभागातील मोजक्या जागी बदली करण्यासाठी अनेकांचे मंत्रालयात लॉबीग सुरु आहे. तर, काहींनी मंत्र्यापर्यंत फिल्डिंग लावल्याचे बोलले जात आहे.
मंत्री रवींद्र चव्हाण यांची घेणार भेट
यंदाच्या बदल्यांमध्ये गडचिरोली, चंद्रपूर सारख्या दुर्गम भागातील ‘पीडब्लूडी’तील अधिकाऱ्यांवर अन्याय झाल्यास न्यायालयाचे दार ठोठावणार, असा ईशारा कारेमोरे यांनी दिलाय. तसेच ‘पीडब्लूडी’ विभागाचे मंत्री रवींद्र चव्हाण यांची भेट घेऊन पारदर्शक बदल्या करण्याची मागणी करणार असल्याचे कारेमोरे यांनी सांगितले.