विश्व भारत ऑनलाईन :
महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून देणाऱ्या अनेक नाट्यमय घडामोडी गेल्या काही महिन्यात घडल्या आहेत.राष्ट्रवादीचे दिग्गज नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मुंबईतील मंत्रालयात दोघांची भेट झाल्याची माहिती आहे. दोघांच्या भेटीचं नेमकं कारण अद्यापही गुलदस्त्यात आहे. मात्र, या भेटीची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.
आव्हाड काय म्हणाले?
मतदारसंघातील कामासाठी आपण देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली, अशी माहिती जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे. मात्र नेमक्या कुठल्या कामासाठी ही भेट झाली, याचा तपशील समोर आलेला नाही. जितेंद्र आव्हाड हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू मानले जातात. त्यामुळे या भेटीने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी नुकतीच केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. यावरुनही चर्चेला उधाण आलं होतं. खडसेंची घरवापसी होणार नाही, असं सांगताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राष्ट्रवादीत राजकीय बॉम्बस्फोट होणार असल्याचा दावा केला होता. त्यामुळे बावनकुळेंचा अंगुलीनिर्देश नेमका कोणाकडे आहे, हे स्पष्ट झालेलं नाही.