विश्व भारत ऑनलाईन :
राज्यात शिवसेनेत उभी फूट पडली आहे. पक्षातील फुटीनंतर पहिल्यांदाच होऊ घातलेल्या अंधेरी (पूर्व) विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीपूर्वी पक्षाचे ‘धनुष्यबाण’ हे निवडणूक चिन्ह ठाकरे गटाकडे राहणार की शिंदे, याबद्दलची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
यावर शुक्रवारी आज केंद्रीय निवडणूक आयोगाने महत्त्वाचा निर्णय घेण्याच्या दृष्टीने पाऊले उचलली आहेत. निवडणूक आयोगाने आता ठाकरे गटाला उद्या (दि. 8) दुपारी 2 पर्यंत ठाकरे गटाला मुदत दिली आहे. दुपारी दोन वाजेपर्यंत त्यांना उत्तर सादर करावे लागणार आहे. तर दुसरीकडे शिंदे गटाने धनुष्यबाण चिन्हावर अधिकृत दावा केला आहे. निवडणूक आयोगानं उद्धव ठाकरेंना एक पत्र पाठवून मुदतवाढीची माहिती दिली आहे. तसंच त्यांना हवा असलेला शिंदे गटाचे वकील चिराग शाह यांच्या याचिकेचा तपशील 4 तारखेलाच ठाकरे गटाला पाठवल्याचा दावा निवडणूक आयोगानं केला आहे. या पत्रासोबत पुन्हा एकदा तो तपशील पाठवला असल्याचं आयोगानं सांगितलं आहे.
तत्पूर्वी, आजवर दोनवेळा मुदतवाढ मागणाऱ्या ठाकरे गटाने आज (दि.7) पहिल्यांदाच आपले प्राथमिक लेखी निवेदन आयोगात सादर केले. शिंदे गटाची कागदपत्रं आम्हाला अद्याप मिळालेली नाहीत अशी तक्रार करत ठाकरे गटाने आज निवडणूक आयोगात आपली बाजू मांडली. बाजू मांडण्यासाठी ठाकरे गटाला आज शेवटची मुदत होती. पक्षावर अजूनही आमचं वर्चस्व आहे हे सांगतानाच सविस्तर कागदपत्रं सादर करण्यासाठी आपल्याला किमान 15 ते 20 दिवसांचा वेळ मिळावा ही मागणी ठाकरे गटाने केली होती. मात्र त्यांना उद्यापर्यंतची मुदत देण्यात आली आहे.
निवडणूक आयोगाकडे केलेल्या अर्जात, शिंदे गटाने म्हटले आहे की उद्धव ठाकरे गटाने चिन्ह गमावले आहे. ३ नोव्हेंबरच्या अंधेरी (पूर्व) विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने चिन्हाच्या मुद्द्यांवर त्वरित निर्णय द्यावा अशी विनंती त्यांनी केली होती. शिवसेनेचे नेते, उपनेते, राज्य संपर्कप्रमुख, जिल्हा संपर्कप्रमुख, राज्यप्रमुख, सचिव, जिल्हाप्रमुख, राज्य विधीमंडळ आणि संसदेत पक्षाचे निवडून आलेले सदस्य तसेच महापौर आणि जिल्हा परिषदांचे अध्यक्ष यांचाही त्यांना पाठिंबा असल्याचा दावा शिंदे गटाने केला होता.