विश्व भारत ऑनलाईन :
जानेवारी ते सप्टेंबर या नऊ महिन्यांत झालेल्या ८१७ शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये ३७९ प्रकरणे मदतीसाठी पात्र ठरली आहेत, तर २६० प्रकरणे ही अपात्र ठरविण्यात आली आहेत. १७८ प्रकरणांमध्ये चौकशी सुरू आहे. याच कालावधीत सर्वाधिक २३२ शेतकरी आत्महत्या अमरावती जिल्ह्यात झाल्या आहेत. त्याखालोखाल यवतमाळ जिल्ह्यात २१८, बुलढाणा जिल्ह्यात १८५, अकोल्यात १०१ तर वाशीम जिल्ह्यात ८१ शेतकरी आत्महत्यांची नोंद झाली आहे.
समाधानकारक पावसाने चांगले उत्पादन होईल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती, पण जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या तीनही पावसाळी महिन्यांत झालेल्या सततच्या पावसामुळे अनेक भागात उभी पिके नष्ट झाली, सोयाबीन पिवळे पडले, कपाशीची वाढ खुंटली. सोयाबीन आणि कापूस या दोन प्रमुख पिकांवर विसंबून असलेल्या अमरावती विभागातील शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीला तोंड द्यावे लागले. आता वर्षभराच्या खर्चाचे नियोजन कसे करायचे, हा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. त्यामुळे आता शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढल्याचे दिसून आले आहे.
शेतकरी आत्महत्यांसाठी सावकारी कर्ज हा एक मोठा घटक कारणीभूत मानला जातो. बँकांकडून वेळेवर आणि पुरेसा पतपुरवठा झाल्यास शेतकऱ्यांना पीक कर्जाच्या माध्यमातून दिलासा मिळू शकतो, पण राष्ट्रीयीकृत बँका कर्ज वाटपाच्या बाबतीत हात आखडता घेतात, त्यामुळे शेतकऱ्यांना नाइलाजाने खासगी सावकाराकडे धाव घ्यावी लागते.