नववर्षाचे स्वागत करण्यासाठी नागपूर सज्ज आहे. तरुणाईची उत्सूकता शिगेला पोहचली आहे. हॉटेल, पब, बार, तलाव अशा सर्वच ठिकाणी नववर्षाच्या जल्लोषाची व्यवस्था दिसून येत आहे. नागपुरात तळीरामांवर नजर ठेवण्यासाठी ३९ चेकपोस्ट तयार आहेत. अधिवेशन आटोपताच या बंदोबस्तात पोलीस लागले. अप्रिय घटना टाळण्यासाठी अडीच हजारावर पोलीस सज्ज आहेत. वाहतूक पोलिसांसह गुन्हे शाखा आणि विशेष पथक पोलिसही पहाटेपर्यंत रस्त्यावर पहारा असणार आहे. त्यामुळे रात्रीच्या सुमारास पार्टी साजरी करून घराकडे परतणाऱ्यांना पोलिसांच्या कारवाईस सामोरे जावे लागू शकते.
सुरक्षा व्यवस्थेसाठी २५०० पोलिस
अधिकारी-कर्मचारी सज्ज आहेत. थर्टी फर्स्टसाठी शहरातील मोठमोठे हॉटेल्स, लॉन्स, खानावळी, ढाबे आणि सभागृह सजले आहेत. युवकांना आकर्षित करण्यासाठी फेसबूक, व्हॉट्सऍप, मेल आणि अन्य माध्यमांनी पार्ट्यांबाबत संदेश पोहचविण्यात आले. यासोबत नाईट क्लब, बॅश, फ्लोअर डान्स, बारही सज्ज झाले आहेत.
३२ गस्त वाहन👇
रस्त्यावर गोंधळ घालणारे आणि सुसाट वाहने चालविणाऱ्यांवर अंकुश ठेवण्यासाठी ३२ गस्त वाहनांसह १२० चार्ली पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. वाहतूक विभागाने ७०० पोलीस कर्मचारी मंगळवारपासूनच तैनात केले आहेत. त्यामुळे मद्य प्राशन करून वाहन चालविणाऱ्यांना दंडासह रात्र पोलीस ठाण्यात काढावी लागणार आहे.
येथे बंदोबस्त👇
अंबाझरी, सिव्हिल लाइन्स, शंकरनगर, धरमपेठ, फुटाळा तलाव, वर्धमाननगर, मेडिकल चौक, अजनीत पोलिसांचा विशेष बंदोबस्त राहणार आहे. प्रत्येक चौकात वाहतूक पोलिसांचे पथक तैनात करण्यात येतील. त्यांच्याकडे ‘स्पीड गन व ब्रीथ ऍनालायझर‘ राहणार असून दंडात्मक कारवाईऐवजी गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. पोलिसांची खासगी पार्ट्यांवरही नजर असणार आहे. त्यामुळे कुणालाही परवानगीशिवाय लाऊडस्पिकर वाजविता येणार नाही, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.