✍️मोहन कारेमोरे
महसूल आणि जनसामान्यांचे नाते आणखी घट्ट विणण्यासाठी राज्य सरकार अतोनात प्रयत्न करते. सामान्य नागरिकांची कामे लवकर व्हावीत, यासाठी तलाठी ते तहसीलदार आहेत. मात्र, औरंगाबाद जिल्ह्यात वेगळीच परिस्थिती दिसून येते.
औरंगाबाद जिल्ह्यात महसूल विभागातर्फे क्रीडा स्पर्धा आहेत. यात औरंगाबाद, पैठण,कन्नड, सिल्लोड, सोयगाव, फुलंब्री, खुलताबाद, गंगापूर, वैजापूर या तहसील मधील बरेच कर्मचारी सहभागी होतात. पण, काही तालुक्यातील तलाठी मागील 8-10 दिवसांपासून गावामध्ये गेलेच नाहीत. त्यामुळे सामान्य माणूस पूर्णपणे वैतागून गेलाय. इतकेच काय तर तहसील कार्यालय ओस पडली आहेत. ज्याप्रमाणे कोरोना काळात परिस्थिती उद्भवली होती, तशीच अवस्था दिसतेय.
जिल्हाधिकारी देतील लक्ष…?
तलाठी गावात हजर नसतात. दुष्काळ याद्या घरातून तलाठी तयार करतात. मनमानी कारभार सुरु आहे. काही तहसीलदारांचे कर्मचाऱ्यांवर नियंत्रण नाही. मनमर्जीपणे गाडा हाकला जातोय, अशीच ओरड नागरिक करीत आहेत. आपण नागरिकांसाठी नोकरी करीत नसून स्वतःसाठी करतोय, इतकी मुजोरी काही कर्मचाऱ्यांमध्ये दिसते.याकडे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडेय लक्ष देतील काय? हा प्रश्न आहे.
कर्मचारी करतात दिशाभूल
काही कर्मचारी स्पर्धेत सहभागी झाले. परंतु, काहींना तर कोणतेच खेळ खेळता येत नाही. तरी, त्यांचेही या स्पर्धेमुळे चांगलेच सुगीचे दिवस आले आहेत. इकडे नागरिकांना सांगायचे स्पर्धेत आहो आणि तिकडे घरी शासकीय दिवशी आराम करायचा, ही पद्धत बंद कधी होणार? असा प्रश्न सामान्य विचारत आहेत. एरवी दांडी मारणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कोणती कारवाई होईल की ‘महसूल मध्ये काहीही करा, काही होत नाही’, हे ब्रीदवाक्य कायमच आणखी रोवले जाणार, असा मोठा प्रश्न कायमच नागरिकांना सतावत आहे.