जीवनात लाज लज्जा बाळगून चालत नाही. मेहनत, परिश्रम आणि बुद्धीमत्तेची जोड द्या, त्यातून प्रगती नक्की होईल. प्रगती करायची असेल तर व्यवसायाशिवाय पर्याय नाही, असा कानमंत्र केंद्रीय लघु सूक्ष्म मध्यम मंत्री नारायण राणे यांनी तरूण उद्योजकांना दिला.
नारायण राणे पुण्यातील लोणावळ्यात आयोजित कोळी महासंघाच्या स्वयंरोजगार मेळाव्यात बोलत होते. या मेळाव्यात नारायण राणे यांनी त्याच्या करीअरमधले अनेक चढ-उताराचे किस्से सांगितले.
मटण व्यवसाय
मुंबईत अनेक कामे केली, ग्रेड वन हॉटेल, गॅरेज, टॅक्सी-टेम्पो चालवला. मराठी माणूस जे व्यवसाय करत नाही असा मटणाचा व्यवसाय देखील केला. आजही आहे पण आता भावांना देऊन टाकला असल्याची आठवण नारायण राणे यांनी सांगितली. तसेच लाज लज्जा बाळगून चालत नाही, मेहनत, परिश्रम आणि बुद्धीमत्तेची जोड घ्या प्रगती नक्की होईल. आणि व्यवसायानेच प्रगती होते मात्र शिक्षण ही गरजेचे असल्यास त्यांनी सांगितले.
सरकारी नोकरी…
नारायण राणे यांना सरकारी नोकरी करत असल्याचा किस्साही सांगितला. मी पण इन्कम टॅक्समध्ये 13 वर्ष नोकरी केली. सरकारी पगार किती तुम्हाला माहिती आहे. कधी-कधी घरी जायपर्यंत मित्र भेटले की पार्टी झाली, तर तो पगारही संपून जायचा असा किस्सा सांगताच एकच हशा पिकला.