जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील हसनाबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत हसनाबाद गावाजवळील गिरीजा नदीपात्रावरील पुलावर महसूल विभागाच्या पथकासमोरच वाळू माफीयांनी एकमेकांवर तलवारी आणि लोखंडी रॉड काढून एकमेकांवर हल्ला केला. ही घटना बुधवारी रात्रीच्या सुमारास घडली.
सुमारे एक तास हा राडा सुरू होता, अशी माहिती समोर आली आहे. गिरजा नदीपात्रामध्ये वाळू माफियाकडून हायवा जेसीबी ट्रॅक्टरच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात अवैधरित्या वाळू उपसा सुरू होता. यादरम्यान वाळू उपसण्याच्या हद्दीवरून दोन गटात वाद अशी माहिती समोर आली आहे.
महसूल विभागाच्या पथकासमोरच हा वाद झाल्याची माहिती आहे. या वादानंतर महसूल विभागाच्या पथकाने या ठिकाणाहून पळ काढल्याचे सांगितले जात आहे. यानंतर दोन्ही गटात वाद मिटल्याची माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर हसनाबाद पोलिसांनी या प्रकरणी दोन्ही गटावर 107 प्रमाणे कारवाई केली आहे.
आमदाराची तक्रार
ठाकरे गटाचे माजी आमदार संतोष सांबरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लेखी पत्र देऊन संबंधित वाळू माफियांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या वाळूमाफियामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या जीवाला धोका असल्याचे त्यांनी पत्रात म्हटलं आहे.स्थानिक प्रशासनाला हाताशी धरून मोठ्या प्रमाणात शासनाचा महसूल बुडण्याचे कामे या ठिकाणी होत असल्याचा आरोप त्यांनी या पत्रातून केला आहे. संबंधित वाळू माफियावर आणि स्थानिक प्रशासनावर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
विश्वभारत News Website