विशेष
सर्व नियम धाब्यावर बसवून सार्वजनिक बांधकाम विभागात (पीडब्लूडी) बदल्यांचा घोळ सुरु आहे. कार्यकारी अभियंता (नागपूर)जनार्दन भानुसे यांच्याकडे अधीक्षक अभियंता पदाचा पदभार देण्यात आला आहे. भानुसे यांच्यापेक्षा वरिष्ठ अधिकारी आहेत. तरीही भानुसे यांच्याकडेच का कारभार दिला आहे? कारभार दिलाय हेही मान्य, मात्र अजूनही कायमस्वरूपी अधिकारी अधिक्षक अभियंता पदावर का विराजमान झालेले नाही? अशी चर्चा आहे.मागील 5 महिन्यात एकही सक्षम अधिकारी पीडब्लूडी विभागाला मिळाला नाही का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.1 जानेवारी 2023 पासून अधीक्षक अभियंता या पदावर भानुसे कार्यरत आहेत. त्यामुळे सरकारचे काम नियमबाह्य दिसत आहे.
कोटीची बोली…
सार्वजनिक बांधकाम विभागात बदल्यांचा घोळ झाला आहे. पदोन्नती, बदली हवी असल्यास खोके भरून पैसे तयार ठेवावे लागतात, असा काही अधिकाऱ्यांचा सूर आहे. जर पैसे दिले नाही, तर राज्याच्या एका कोपऱ्यात बदली केली जाते. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचे कोकण विभाग वगळता अन्य विभागाच्या प्रशासकीय कामाकडे लक्ष नसल्याचे दिसत आहे.
महिला अधिकाऱ्यांना डावलले
सार्वजनिक बांधकाम विभागात मोठ्या प्रमाणात महिला अधिकारी आहेत. त्यांच्याकडे कधीही मोठ्या पदाचा कार्यभार देण्यात आलेला नाही. महिला सक्षम असताना आणि सरकार महिलांसाठी बऱ्याच सकारात्मक गोष्टी करीत असताना महिला अधिकाऱ्यांना पीडब्लूडी मध्ये डावलले जात आहे. एखादी ‘साइड पोस्टिंग’वर्षानुवर्षे दिली जाते. ही बाब खेदजनक असल्याची चर्चा आहे.