धडाकेबाज आयएएस अधिकारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुनील केंद्रेकरांना बळजबरीने स्वेच्छानिवृत्ती घेण्यास भाग पाडल्याचा दावा विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे. केंद्रेकरांनी स्वच्छानिवृत्ती घेतली नसून, त्यांना ती घेण्यास भाग पाडण्यात आले, असे ते म्हणाले.
केंद्रेकरांचा सरकारमधील काहींना त्रास
विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकरांच्या निवृत्तीला अद्याप 2 वर्षांचा कालावधी शिल्लक आहे. पण तत्पूर्वीच त्यांनी स्वच्छेनिवृत्ती घेतल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या प्रकरणी आता विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केंद्रेकरांवर स्वेच्छानिवृत्ती घेण्यासाठी दबाव टाकण्यात आल्याचा दावा केला आहे. सुनील केंद्रेकर मराठवाड्याच्या मातीशी जुळलेले आहेत. त्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण आहे. त्यांनी एक सर्व्हे केला होता. तसेच त्याविषयी सरकारला काही सूचना केल्या होत्या. पण त्याचा सरकारमधील काहींना त्रास झाला. त्यामुळे त्यांनी केंद्रेकरांना राजीनामा देण्यास भाग पाडले, असे दानवे म्हणाले.
सुनील केंद्रेकर स्वाभिमानी अधिकारी आहेत. त्यांनी दबावाला बळी न पडता आपला राजीनामा सरकारच्या तोंडावर फेकून मारला. ही स्वेच्छानिवृत्ती नाही. त्यांना राजीनामा देण्यास भाग पाडण्यात आले, असे दानवे म्हणाले. तर, केंद्रेकर लवकरच राजकारणात प्रवेश करतील, अशीही चर्चा जोर धरत आहे. राष्ट्रीय पक्षाकडून ऑफर असल्याची चर्चाही आहे.
विश्वभारत News Website