राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त शैलजा दराडे यांना निलंबित करण्यात आले आहे. शिक्षण विभागात नाेकरी लावण्याच्या आमिषाने उमेदवारांकडून त्यांनी पैसे घेतले. तसेच नाेकरी न लावता फसवणूक केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दखल करण्यात आला होता.
फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर तब्बल पाच महिन्यांनंतर राज्य शासनाने निलंबनाची कारवाई केली आहे.
प्राप्त माहितीनुसार,राज्य शिक्षण परिषदेचे दोन अध्यक्षांना टीईटी घोटाळ्यात अटक झाल्यानंतर शैलजा दराडे यांची त्या जागी नियुक्ती करण्यात आली होती. मात्र महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त शैलजा दराडे यांच्यासह भावाविरुद्ध हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. त्यांच्यावर शिक्षण संचालक म्हणून कार्यरत असताना राज्यातील 45 शिक्षकांकडून प्रत्येकी 12 ते 14 लाख रुपये घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणी पोपट सुखदेव सूर्यवंशी यांनी फिर्याद दिली होती. हडपसर पोलिसांनी शैलजा रामचंद्र दराडे आणि दादासाहेब रामचंद्र दराडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हे प्रकार 15 जून 2019 पासून सुरु होते.
डी .एड. झालेल्या शिक्षकांना कायमस्वरूपी नोकरी लावण्यासाठी 12 लाख तर बी. एड. झालेल्या कडून 14 लाख रुपये शैलजा दराडे या त्यांचा भाऊ दादासाहेब दराडेमार्फत घेत होत्या. याप्रकरणी अखेर त्यांचं निलंबन करण्यात आलं आहे.