नागपूर : सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत उल्लेखनीय कामगिरी करणार्या अभियंत्यांना राज्य शासनातर्फे पुरस्कार घोषित करण्यात आला.याच शृंखलेत सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता संजय उपाध्ये यांना 2021-22 चा वैयक्तिक पुरस्कार घोषित करण्यात आला, तर गुणवंत कर्मचारी म्हणून वरिष्ठ लिपिक भारती कावळे, उपमुख्य वास्तू शास्त्रज्ञ अनिता खेरडे यांचीही पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
भारतरत्न सर विश्वेश्वरैया यांच्या जयंतीदिनी 15 सप्टेंबरला मुंबई येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. सन्मान चिन्ह आणि प्रशस्तिपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
उपाध्ये यांनी कोरोना काळात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात साबांअंतर्गत विशेष कामे केली. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या कामांना गती दिल्याने डॉक्टरांना रुग्णसेवा देताना सोईचे झाले. हिवाळी अधिवेशनादरम्यान उत्तम दर्जाची सेवा दिली. इतिहासाचे प्रतिबिंब झळकेल अशा पद्धतीची इमारतीत चित्रे आणि इतिहास मांडला आहे. प्रकल्प राबविताना तांत्रिक कौशल्य आणि कल्पकता वापरली. कोरोना काळातील कामांची शासनाने दखल घेऊन पुरस्कार घोषित केला. या पुरस्काराबद्दल मुख्य अभियंता दिनेश नंदनवार यांचे संजय उपाध्ये यांनी आभार मानले आहेत. शाखा अभियंता आणि मित्रपरिवाराने संजय उपाध्ये यांचे अभिनंदन केले आहे.