नागपूर जिल्ह्यातील 357 आणि 5 ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत भाजपने विदर्भात अनेक जागी मुसंडी मारल्याचे दिसत आहे. स्थानिक आघाड्यांचे राजकारण लक्षात घेता महायुती आणि मविआत दावे-प्रतिदावे सुरू आहेत. हिंगणा तालुक्यातील लोणारा येथे काँग्रेसला मात देत 8 जणांचे भाजपचे पॅनल निवडून आल्याने सरपंचाची घोड्यावर मिरवणूक काढण्यात आली. आ. समीर मेघे यांच्यासाठी हा मोठा विजय आहे. दरम्यान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आतापर्यंत 357 पैकी 100 जागा भाजपने जिंकल्याचा दावा करीत विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले. कामठी, मौदा, रामटेक, पारशिवनी, उमरेड, कुही, हिंगणा, कळमेश्वर तालुक्यात भाजप बऱ्या पैकी विजय झाल्याचे समजते.
सर्वाधिक चुरशीच्या काटोल नरखेड विधानसभा मतदार संघात भाजप, अजितदादा पवार गट आणि दुसरीकडे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (शरद पवार गट) यांनी दावे-प्रतिदावे केले आहेत. आतापर्यत १७ निकाल हाती आले असून, यापैकी १५ ग्राम पंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनिल देशमुख गटाची एक हाती सत्ता आल्याचा दावा देशमुख यांनी केला. यात काटोल तालुक्यातील ८ पैकी ७ तर नरखेड तालुक्यातील ८ पैकी ७ ग्राम पंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनिल देशमुख गटाने दावा केला आहे.
बाजारगाव ग्राम पंचायतीवरही अनिल देशमुख गटाने दावेदारी सांगितली आहे. दरम्यान, या ठिकाणी काका-पुतण्याची जोरदार लढाई होती. भाजपने मोगरा, बानोर, खरसोली (अजित पवार गट), कामठी तालुक्यात भाजपने मुसंडी मारल्याने भाजपचे माजी आमदार व निवडणूक प्रभारी डॉ आशीष देशमुख, जिल्हाध्यक्ष सुधाकर कोहळे यांच्या उपस्थितीत जल्लोषही साजरा करण्यात आला. एकाचवेळी माजी मंत्री अनिल देशमुख, डॉ. आशीष देशमुख यांच्या घरी, जनसंपर्क कार्यालयासमोर ढोलताशांचा गजर, जल्लोष पहायला मिळाला.
विदर्भात दुपारपर्यंत भाजपला अनेक ठिकाणी आघाडी असून, महायुती सरकारला हा कौल असल्याचे भाजपनेत्यांनी म्हटले आहे.
दुसरीकडे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी 80 टक्के ग्रामपंचायत मविआच्या ताब्यात असतील असा दावा केला आहे. असे असले तरी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना भंडारा जिल्ह्यात आतापर्यंत एकही ग्रामपंचायत राखता न आल्याने आगामी विधानसभा, लोकसभा निवडणुकीत मविआपुढे भाजप-शिंदे-अजितदादा पवार गट मोठे आव्हान उभे करणार का, हा प्रश्न आहे. माजी आमदार चरण वाघमारे यांच्या नेतृत्वाखालील बीआरएसने भंडारा जिल्ह्यात झेंडा रोवला आहे. सायंकाळपर्यंत या निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे
विश्वभारत News Website