नागपूर भाजपतर्फे बांधकाम कामगारांसाठी आयोजित शिबीरात नियोजन बिघडल्याने चेंगराचेंगरी झाली. यामध्ये एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला तर काही 8 ते 10 महिला जखमी झाल्या. ही घटना आज शनिवारी सकाळी अकरा वाजता शहरातील कविवर्य सुरेश भट सभागृहात घडली. मनूबाई तुळशीराम राजपूत (65, आशीर्वादनगर) असे मृतक महिलेचे नाव आहे. भाजपतर्फे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळा अंतर्गत नोंदणीकृत कामगारांसाठी स्वयंपाकघर व इतर आवश्यक सामानाच्या वितरणासाठी शिबीर आयोजित करण्यात आले आहे.
8 मार्च रोजी हे शिबीर सुरू झाले. यात महिलांना गृहोपयोगी वस्तू संचाचेदेखील वितरण होणार होते. सकाळी 10 वाजल्यापासून शिबीराची वेळ होती. मात्र सकाळी सात वाजल्यापासूनच सुरेश भट सभागृहासमोर लाभार्थ्यांची गर्दी जमली होती. हजारो लोक बाहेर उभे होते. सकाळी सव्वा दहा वाजेनंतर सभागृहाचे दार उघडले असता आज जाण्यासाठी सर्वांनी धाव घेतली. त्यात गर्दी झाली व काही महिला खाली पडल्या. चेंगराचेंगरीदरम्यान मनुबाईंच्या अंगावरून अनेक जण गेले. त्यांच्यासह इतर महिला जखमी झाल्या. त्यांना तातडीने मेडिकल रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी मनुबाईंना मृत घोषित केले. काही जखमी महिलांचा उपचार सुरू आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळाकडे धाव घेतली.