नागपूर जिल्ह्यातील रामटेक विधानसभा मतदारसंघ शिवसेनेला (उद्धव ठाकरे) मिळाले असून या पक्षाने उमेदवाराची घोषणाही केली आहे. परंतु, काँग्रेस नेत्यांकडून मतदारसंघाची अदलाबदल करून हा मतदारसंघ आपल्याकडे ठेवण्याची धडपड सुरूच आहे. राजेंद्र मुळक यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता कमी आहे.
काँग्रेसचे माजी मंत्री राजेंद्र मुळक यांना रामटेकची जागा लढवायची आहे. त्यांनी या मतदारसंघात दहा वर्षांपासून तयार केली. ही जागा शिवसेनेच्या वाट्याला गेल्याने मुळक यांचा हिरमोड झाला आहे.
उमरेड विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव झाल्यापासून मुळक यांना विधानसभेत जाता आलेले नाही. आता महाविकास आघाडीतील जागावाटपाने त्यांची संधी हुकते की काय अशी स्थिती आहे. मात्र, मुळक यांनी प्रयत्न सोडलेले नाहीत. माजी मंत्री सुनील केदार यांच्या मदतीने ते उद्धव ठाकरे यांना गळ घालत असल्याचे दिसून येत आहे. केदार आणि मुळक हे सलग दोन दिवस मातोश्रीवर गेल्याचे वृत्त आहे.
त्यांनी रामटकेच्या बदल्यात जिल्ह्यातील अन्य मतदारसंघ शिवसेनेला देण्याची तयारी दर्शवली आहे. एवढेच नव्हेतर शिवसेनेच्या उमेदवारच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहण्याची हमी दिली आहे. मुळक यांना रामटेकमधून लढता यावे म्हणून उमरेड किंवा कामठी मतदारसंघ शिवसेनेला देण्याचा विचार केला जाऊ शकतो, असेही सांगितले जात आहे.