महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालावर आक्षेप घेतला जात आहे. कंट्रोल युनिट वरील बारकोड बदलविल्याचा संशय विरोधी पक्षाने केला आहे. मशीनमध्ये दोष नसून काही अधिकाऱ्यांनी गडबड केल्याची माहिती आहे.
जवळपास सर्वच विरोधी पक्षांनी आक्षेप घेतला आहे. सत्ताधाऱ्यांनी ईव्हीएममध्ये घोळ करून ही निवडणूक जिंकली असल्याचा दावा केला जात आहे. त्याचबरोबर मतदानाच्या दिवशी सायंकाळी ५ वाजल्यानंतर ७५ लाखांहून अधिक लोकांनी मतदान केल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली होती. अनेक ठिकाणी रात्री ११.३० वाजेपर्यंत मतदान चालू होतं असंही सांगण्यात आलं होतं. या आकडेवारीवर विरोधी पक्षांनी संशय व्यक्त केला आहे. अशातच वंचित बहुजन आघाडीने देखील निवडणूक प्रक्रियेवर संशय व्यक्त करत निवडणूक आयोगाला एक पत्र पाठवलं आहे. या पत्राद्वारे वंचितने निवडणूक आयोगाला तीन प्रश्न विचारले आहेत.
मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र हे सांगतील का?
१. मतदाराला त्याचे/तिचे/त्यांचे मत देण्यासाठी लागणारा वेळ
२. जिल्हा निवडणूक अधिकारी/रिटर्निंग अधिकारी आणि पर्यवेक्षक यांनी २० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ ते संध्याकाळी ६ या वेळेत झालेल्या मतांची नोंद केली आहे का. तशी नोंद झाली असल्यास त्याचा तपशील देणे
३. जिल्हा निवडणूक अधिकारी/रिटर्निंग ऑफिसर यांनी २० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५:५९ वाजता रांगेत उभ्या असलेल्या मतदारांना जारी केलेल्या टोकनची संख्या नोंदवली आहे का? नोंदवली असल्यास, त्याचा तपशील द्यावा.