देशीकट्टा, पिस्तूल,चाकू, खंजिरचा फोटो सोशल मीडियावर ठेवल्यास खबरदार
देशीकट्टा, पिस्तूल असो किंवा मोठा चाकू आणि खंजिर या शस्त्राचे सोशल मीडियावरती पोस्ट अपलोड करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. दरम्यान जालना जिल्ह्यात कोणी अवैध शस्त्र बाळगत असेल तर त्याची माहिती नागरिकांनी पोलिसांना द्यावी, असे आवाहन जालन्याचे पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल यांनी केल आहे. त्यामुळे सोशल मीडियावर शस्त्रांचे फोटो अपलोड करून भाईगिरी करणे आता चांगलेच महागात पडणार आहे.
पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल यांनी सांगितले की, कोणी अवैध शस्त्राचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले तर त्यांच्यावर गुन्हा दाखल होईल. त्यांना अटक करण्यात येईल. वर्षभरात तीन ते चार जणांवर कारवाई झाली. त्या लोकांना अटक करुन तडीपार किंवा मोकाची कारवाई केली आहे. तसेच परवानाधारक शस्त्रासोबत फोटो काढून समाजात दहशत निर्माण करणे गुन्हा आहे. शस्त्राचा परवाना स्वसंरक्षणासाठी दिला आहे. परंतु त्याचा गैरवापर करणाऱ्यांचा परवाना रद्द करुन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल, असे बंसल यांनी सांगितले.