मोहघाटा, सराटी परिसरात वाघाचा मुक्तसंचार असून वाघ हल्ला करीत असल्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. सराटी मार्गावर मागील दोन दिवसांपासून वाघाचे दर्शन होत असल्याचे बोलले जात होते. भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यात काल रात्री याच मार्गाने दुचाकीने जात असलेल्या दाम्पत्यावर वाघाने हल्ला केल्याची घटना घडल्यानंतर सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले.
साकोली तालुक्यातील सराटी येथील स्वप्नील रंगारी आणि त्यांची पत्नी कल्याणी हे ५ एप्रिल रोजी रात्री दुचाकीने स्वागवी सराटी येथे जात असताना रस्त्यात अचानक एका वाघाने त्याच्या दुचाकीवर उडी घेतली. मात्र स्वप्नील यांनी न डगमगता दुचाकीचा तोल सावरला आणि वेगाने गाडी पुढे घेतली.त्यामुळे दोघांचा जीव थोडक्यात बचावला
गावात पोहचताच दोघांनी वाघाने हल्ला केल्याची बाब पोलीस पाटील यांना सांगितली. त्यानंतर वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले.गावातील नागरिकांना कामानिमित्त दररोज याच मार्गाने सकोलीला जावे लागते. या मार्गावर आता वाघाचा मुक्तसंचार असल्याने जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे या वाघाला लवकरात लवकर जेरबंद करून सुरक्षेच्या उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
भंडारा : सकाळी सात वाजताच्या सुमारास स्वतःच्या शेतात एक शेतकरी फुले वेचत होता. वेचता वेचता त्यांच्या समोर उभा ठाकला साक्षात वाघोबा. मात्र, या धाडसी शेतकऱ्याने घाबरून न जाता वाघाच्या डोळ्यात डोळे टाकून हळूवार एक एक पाऊल मागे टाकण्यास सुरुवात केली.
तोच वाघाने त्यांच्या अंगावर उडी घेतली. शेतकऱ्याने आरडाओरडा करताच वाघाने पळ काढला. या हल्ल्यात शेतकरी जखमी झाला. काही वेळनंतर बाजूच्या शेतात कामासाठी आलेल्या शेतकऱ्यांना रक्तबंबाळ अवस्थेत दिसलेल्या शेतकऱ्याला ताबडतोब रुग्णालयात हलविले.
साकोली तालुक्यात सध्या वाघ आणि बिबट्याची दहशत आहे. त्यामुळे दिवसाढवळ्या सुद्धा जीव मुठीत घेऊन शेतकऱ्यांना शेतात काम करावे लागत आहे. त्यामुळे शेतकरी शेतात जाण्याचे धाडस करीत नाही ज्यामुळे शेतीची कामे प्रभावित होत आहे. अशाच कारणावरून नुकतेच दोन वाघिणीना जेरबंद करण्यात आले आहे हे विशेष.
साकोली तालुक्यातील मोहघाटा गावातील शेतात फुले तोडण्यासाठी गेलेले शेतकरी दूधराम राजीराम मेश्राम (४१) यांच्यावर अचानक वाघाने हल्ला केल्याने ते जखमी झाले. आज दि. ६ एप्रिल रोजी ही घटना घडली. या घटनेमुळे साकोली परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
माहितीनुसार, दूधराम मेश्राम हे आज सकाळी सात वाजता शेतात फुले वेचण्यासाठी गेले होते. साडेसातच्या सुमारास त्यांना वाघ दिसला. न घाबरता ते हळूहळू पाऊल मागे टाकू लागले. मात्र, त्यानंतर वाघाने अचानक त्यांच्यावर हल्ला करून दोन्ही पंजांनी त्यांच्या पोटावर घाव केले. अखेर दुधराम यांनी आरडाओरडा करण्यास सुरूवात केली. त्यामुळे वाघाने तेथून पळ काढला.
मात्र, रक्तबंबाळ दुधराम शेतात निपचित पडून होते. काही वेळाने जवळच्या शेतात कामासाठी आलेले शेतकरी तेथे पोहोचले, त्यानंतर दुधराम यांनी त्यांना मदतीसाठी बोलावले. माहिती मिळताच साकोली पोलीस स्टेशन व वनविभागाच्या पथकाने वनरक्षक राधेश्याम एस.भराडे, बाळू निचेत, रुपाली रावत, सी.आर. घटनास्थळी पोहोचले.
जखमी शेतकऱ्याला तातडीने उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. पोलीस अधिकारी गौतम थुलकर व मनोहर कांबळे अधिक तपास करत आहे. २२ मार्च रोजी भंडारा-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या मोना ॲग्रो इंडस्ट्रीजच्या मागे असलेल्या पोल्ट्री फार्ममध्ये बिबट्याने हल्ला करून १५ ते १७ कोंबड्यांना ठार केले होत्या. या वाघाला जेरबंद करावे, अशी मागणी मोना ॲग्रो इंडस्ट्रीजचे संचालक अरुण गुप्ता व व्यवस्थापक बद्दू उमाडे यांच्यासह स्थानिक नागरिकांनी वनविभागाकडे केली आहे.