अजित पवारांच्या पश्चात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतृत्व कोण करणार आणि पक्षाचे भवितव्य काय, याची चर्चा लगेचच सुरू झाली आहे. राष्ट्रवादीच्या भवितव्यात भाजपची भूमिकाही निर्णायक राहणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना १९९९ मध्ये झाली तेव्हापासून अजित पवार हे शरद पवारांना साथ देत होते. शरद पवारांचा राजकीय उत्तराधिकारी अजित पवार की सुप्रिया सुळे हा मुद्दा पुढे आला आणि अजितदादांमधील अस्वस्थता वाढत गेली. भाजपबरोबर जाण्याचा अजित पवार व अन्य नेत्यांचा प्रस्ताव शरद पवारांनी फेटाळून लावल्याने पक्षांतर्गत वाद उफाळून आला. सुप्रिया सुळे यांच्याकडे राज्याची जबाबदारी सोपविण्यात आल्यावर अजित पवार अधिकच संतप्त झाले. यातूनच अजित पवारांनी काका शरद पवारांच्या विरोधात बंड केले.
अजित पवारांनी स्वतंत्र पक्ष जून २०२३ मध्ये स्थापन केला. त्यांनी प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ आदी नेत्यांना महत्त्व दिले. पडद्याआडून पुत्र पार्थ पवार हे पक्षाची सूत्रे हलवीत होते. २०२४च्या लोकसभा निवडणुकीत अजित पवारांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून पत्नी सुनेत्रा पवार यांना रिंगणात उतरविले होते. तेव्हा भाजपच्या काही नेत्यांनी पत्नीला उमेदवारी देऊ नये, असे सुचविले होते. परंतु अजितदादांनी त्याकडे दुर्लक्ष केले आणि सुनेत्रा पवार यांचा पराभव झाला. विधानसभा निवडणुकीत प्रचाराचे सारे नियोजन पार्थ पवार यांनीच केले होते. पत्नीला खासदारकी तर मुलाकडे पक्षाचे नियोजन यातून अजित पवारांच्या पक्षातही घराणेशाही पुढे आली होती.
राष्ट्रवादीतील अजित पवार गटातील नेतृत्वाची पोकळी आणि पक्षाच्या भवितव्याबाबत निर्माण झालेल्या गोंधळात भाजपची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. राज्यातील एक प्रादेशिक पक्ष संपून भाजपची ताकद वाढणार असल्यास त्या दृष्टीने पावले टाकली जातील. सत्तेची चटक लागलेले राष्ट्रवादीतील बडे नेते कदाचित भाजपचा मार्ग पत्करतील. प्रफुल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ, धनंजय मुंडे अशी नेतेमंडळी भाजपमध्ये प्रवेश करू शकतात. शिवसेना उद्धव ठाकरे गट वाढू नये म्हणून भाजपला शिवसेना शिंदे गटाची काळजी घ्यावी लागते. राष्ट्रवादीबाबत तशी वेळ येणार नाही. शरद पवार गट कसाबसा तग धरून आहे. या सार्या शक्यता लक्षात घेऊन राष्ट्रवादीची सूत्रे कोणाकडे जावीत या दृष्टीने भाजपकडून रणनीती तयार केली जाऊ शकते. तमिळनाडूत जयललिता यांच्या पश्चात अण्णा द्रमुकच्या नेतृत्वाच्या वादात भाजपनेच महत्त्वाची भूमिका बजावली होती याकडे लक्ष वेधण्यात येते.
पुढे काय?
काही दिवसांत हंगामी अध्यक्ष म्हणून खासदार सुनेत्रा पवार यांची निवड केली जाण्याची शक्यता वर्तविली जाते. पण पत्नी सुनेत्रा किंवा पुत्र पार्थ अथवा जय पवार यांना राजकीय किंवा संघटनात्मक अनुभव नाही. भाजपबरोबर सत्तेत सहभागी होण्यासाठी एकत्रित राष्ट्रवादीतील अनेकांनी अजित पवारांच्या पक्षाचा पर्याय निवडला होता. शरद पवार हे भाजपबरोबर येण्याची शक्यता असेल तरच ही सारी नेतेमंडळी पवारांचे नेतृत्व पुन्हा स्वीकारू शकतात. शरद पवारांबरोबर जाऊन विरोधात बसण्याची कोणाची इच्छा दिसत नाही.
विश्वभारत News Website