Breaking News

पक्षीसप्ताहात बहारतर्फे विविध उपक्रमांचे आयोजन* जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते जिल्हा पक्षीसूचीचे प्रकाशन

वर्धा जिल्हा प्रतिनिधी – दि. ५ ते १२ नोव्हेंबर या कालावधीत राज्यात सर्वत्र पक्षीसप्ताह साजरा केला जाणार असून जिल्ह्यात बहार नेचर फाउंडेशनद्वारे व वन विभागाच्या सहकार्याने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या सप्ताहाचा प्रारंभ गुरुवार, दि. ५ रोजी जिल्हा पक्षी सूची प्रकाशनाने होणार असून जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांच्या हस्ते या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात येईल. स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित या कार्यक्रमाला उपवनसंरक्षक सुनील शर्मा, बहारचे अध्यक्ष प्रा. किशोर वानखडे व मानद वन्यजीव रक्षक संजय इंगळे तिगावकर यांची प्रमुख उपस्थिती राहील.
वनविभाग व बहार नेचर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने या पक्षीसूचीचे पुनर्प्रकाशन करण्यात येत असून जिल्ह्यात आतापर्यंत नोंद करण्यात आलेल्या ३०४ पक्ष्यांचा यात समावेश आहे. या सूचीचे प्रथम प्रकाशन २०१५ मध्ये करण्यात आले होते, त्यावेळी त्यात २५१ पक्ष्यांचा समावेश होता. गत पाच वर्षात ५३ पक्ष्यांची नव्याने नोंद झाली असून या पक्षी सप्ताहात ही अद्ययावत सूची प्रकाशित केल्या जाईल.
या सप्ताहात निसर्ग अभ्यासक दिवंगत उल्हास राणे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ बहार व महाराष्ट्र पक्षिमित्र संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ५ ते १२ नोव्हेंबर या कालावधीत दररोज सायंकाळी ७ वाजता फेसबुक लाईव्ह व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. यात राज्य व राष्ट्रीय स्तरावर ओळख असलेले पक्षीअभ्यासक व संशोधक पक्षीविश्वाशी संबंधित विविध विषयांवर संवाद साधतील. या व्याख्यानमालेचे उद्घाटन उपवनसंरक्षक सुनील शर्मा करणार असून बहारच्या फेसबुक पेजवर निसर्गप्रेमींना या व्याख्यानांचा लाभ घेता येईल.
याशिवाय, दि. ६ रोजी आयटीआय परिसरातील कमळ तलाव येथे पक्षीफलक लावण्यात येणार आहे. रविवार, दि. ८ रोजी यवतमाळ जिल्ह्यातील टिपेश्वर अभयारण्याला बहारची चमू भेट देणार असून पक्ष्यांचे निरीक्षण करीत नोंदी घेणार आहेत. तर, दि. १० रोजी पोथरा प्रकल्प, दि. ११ रोजी दिग्रस तलाव आणि दि. १२ ला मदन तलावावर सकाळी सात ते नऊ या कालावधीत
पक्षिनिरीक्षण उपक्रमही आयोजित करण्यात आला आहे. या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन बहारचे उपाध्यक्ष आर्की. रवींद्र पाटील, सचिव दिलीप वीरखडे, राहुल तेलरांधे, डॉ. बाबाजी घेवडे, दीपक गुढेकर, जयंत सबाने, डॉ. जयंत वाघ, पराग दांडगे, स्नेहल कुबडे, राहुल वकारे, अविनाश भोळे, विनोद साळवे, राजेंद्र लांबट, अतुल शर्मा, सुनंदा वानखडे, डॉ. आरती प्रांजळे, अनिल देवतळे, सुरभी बिप्लव यांनी केले आहे.
__________________________________

*बहारची फेसबुक लाईव्ह व्याख्यानमाला*
दि. ५ रोजी पक्षीअभ्यासक दर्शन दुधाने ‘सभोवतालचे पक्षी आणि त्यांची ओळख’ या विषयावर, दि. ६ रोजी बाॅम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटीच्या पक्षीसंशोधक डॉ. मधुमिता पाणिग्रही यांचे ‘रंगीत चिन्हांकन आणि पुनर्दर्शन : पक्षी स्थलांतर अभ्यासात तुमचे योगदान’ यावर, दि. ७ ला नागपूरचे डॉ. अनिल पिंपळापुरे यांचे ‘आम्ही पक्षिमित्र’, दि. ८ ला वाईल्ड लाईफ कन्झर्व्हेशन सोसायटी, इंडियाच्या संचालक साहिला कुडाळकर यांचे ‘अमूर ससाण्याचे समाजाधारित संवर्धन’, दि. ९ रोजी पक्षीसंशोधक डॉ. जयंत वडतकर, अमरावती यांचे ‘घुबडांविषयी बोलू काही’, दि. १० रोजी पक्षीसंशोधक डॉ. राजू कसंबे यांचे ‘कलाकार सुगरणीच्या बहुपत्नीत्वाची गोष्ट’, दि. ११ रोजी वन्यजीव छायाचित्रकार राजदीप राठोड यांचे ‘छायाचित्रणावर प्रकाशझोत’ तर गुरुवार, दि. १२ रोजी पक्षीअभ्यासक वैभव देशमुख यांचे ‘पक्षीनिरीक्षणातून संवर्धनाकडे’ या विषयांवर व्याख्याने होणार आहेत. ही व्याख्याने सायंकाळी ७ ते ८ या दरम्यान https://www.facebook.com/groups/1676098772619208/?ref=share यावर उपलब्ध राहतील.
__________________________________

*पक्षी सप्ताह पाच ते बारा नोव्हेंबर*
दि. ५ नोव्हेंबर हा निसर्गलेखक व पक्षीतज्ज्ञ मारुती चितमपल्ली यांचा जन्मदिन आहे. तर, दि. १२ नोव्हेंबरला आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त पक्षीतज्ज्ञ दिवंगत डॉ. सालीम अली यांचा जन्मदिन असतो. पक्ष्यांसाठी आयुष्य वेचणाऱ्या आणि या क्षेत्रात मैलाचा दगड ठरलेल्या या दोन्ही पक्षीतज्ज्ञांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बहार नेचर फाउंडेशनद्वारे सर्वप्रथम सेवाग्राम येथे झालेल्या १७ व्या विदर्भ पक्षिमित्र संमेलनात सदर तारखांना पक्षी सप्ताह जाहीर करण्याची मागणी करण्यात आली होती. यावर्षी राज्य सरकारने या संदर्भात अधिकृत घोषणा केली असून शासकीय स्तरावर प्रथमच पक्षी सप्ताह साजरा केला जात आहे. अधिकृतरीत्या पक्षीसप्ताह जाहीर करणारे महाराष्ट्र हे भारतातील पहिले राज्य ठरले आहे. लोकांमध्ये पक्षीविषयक जाणीव जागृती निर्माण करणे, हा या आयोजनामागील मूळ उद्देश आहे. शहरपक्षी नीलपंखाचे शिल्प हेदेखिल राज्यात वर्धेकरांचे वेगळेपण दर्शविणारे ठरले आहे.

About Vishwbharat

Check Also

वर्धेत धावत्या रेल्वे व प्लॅटफॉर्मच्या मध्ये अडकलेल्या युवकाचे आरपीएफ पोलीस उपनिरीक्षक व महिला कर्मचारी यांनी वाचवले प्राण

वर्धेत धावत्या रेल्वे व प्लॅटफॉर्मच्या मध्ये अडकलेल्या युवकाचे आरपीएफ पोलीस उपनिरीक्षक व महिला कर्मचारी यांनी …

दत्ता मेघे आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठ, सावंगी आयुर्विज्ञान क्षेत्रातील स्त्री-उद्योजकतेवर कार्यशाळा

वर्धा – दत्ता मेघे आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठाद्वारे इंप्रेण्डिया या आंतरराष्ट्रीय प्रकल्पाच्या सांघिक भागीदारी अंतर्गत सावंगी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *