वर्धा जिल्ह्यातील कारंजा घाडगे तालुक्यातील नारा येथील निवासी आश्रमशाळेत विद्यार्थ्याचा मृतदेह आढळला. येथील आश्रमशाळेतील दूरवस्थेद्दल चर्चा सुरू झाली आहे.
वर्धा जिल्ह्यातील कारंजा घाडगे तालुक्यातील नारा येथील यादवरावजी केचे आश्रमशाळेत ही घटना घडली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहिती नुसार अमरावती जिल्ह्यातील धारणी तालुक्यातील डोमा गावातील विद्यार्थी शिवम सनोज उईके (वय 12) हा यादवराव केचे निवासी आश्रमशाळेत शिकत होता. ही आश्रमशाळा आर्वी विधानसभेचे भाजप आमदार दादाराव केचे यांची असल्याची माहिती आहे.
बुधवारी रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास आश्रमशाळेतील विद्यार्थी रात्री झोपण्यासाठी गेले. त्यांनी अंथरण्यासाठी गाद्या उचलल्या त्यावेळी त्यांना शिवम गाद्यांच्या ढिगाऱ्याखाली दबलेला दिसला. घाबरलेल्या विद्यार्थ्यांनी लगेच याची माहिती शिक्षकांना दिली. शिक्षकांनी शिवमला स्थानिक रूग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषीत केले.
वर्गात दिसला, नंतर झाला गायब
सुत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार शिवमने प्रारंभी सकाळचे दोन तीन तास केले. त्यानंतर तो वर्गात दिसला नाही. विद्यार्थी वर्गात दिसत नसल्याने संबंधित शिक्षकाने निदान इतरांकडे चौकशी केली असती तरी घटना टाळता आली असती, अशी चर्चा आहे. बुधवारी रक्षाबंधन असल्याने शाळेतही रक्षाबंधनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यामुळे सगळे त्याच गडबडीत होते. त्यामुळे ही दुदैवी घटना घडली असे सूत्रांनी सांगितली.
इन कॅमेरा शवविच्छेदन
घटनेची माहिती समजताच मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांशी संपर्क साधत घटनेची कसून चौकशी करण्याची विनंती केली आहे. तसेच पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रवाना केला. गुरुवारी सकाळी इन कॅमेरा शवविच्छेदन करण्यात आले. शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर मृत्यूचं कारण समोर येणार आहे. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.