-भाजपाच्या आत्मनिर्भर कार्यालयाचे उद्घाटन
नागपूर- समाजातील गरीब, मागास, बेरोजगार तरुणांसाठी रोजगार निर्माण करून त्यांना आपल्या पायावर उभे करून रोजगार उपलब्ध करून देऊन सुखी, संपन्न, शक्तिशाली करणे, त्यांचे जीवनमान बदलून टाकून अन्न, वस्त्र, निवारा मिळेल या दिशेने प्रयत्न करणे ही आत्मनिर्भर भारताची संकल्पना आहे. ती साकार करण्याची जबाबदारी आपली सर्वांची आहे, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
भारतीय जनता पक्षाच्या आत्मनिर्भर भारत कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. या ऑनलाईन कार्यक्रमाला प्रामुख्याने खा. विकास महात्मे, आ. गिरीश व्यास, महापौर संदीप जोशी, भाजपाचे शहर अध्यक्ष प्रवीण दटके, जिल्हाध्यक्ष अरविंद गजभिये, आ. मोहन मते, आ. विकास कुंभारे, माजी आ. प्रा. अनिल सोले, अशोक धोटे व अन्य उपस्थित होते. धरमपेठ एक्स्टेंशन शिवाजीनगर येथे हा कार्यक्रम संपन्न झाला.
याप्रसंगी बोलताना गडकरी यांनी, शहर आणि जिल्ह्याचे हे कार्यालय असावे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुखी, समृध्द, शक्तिशाली भारत निर्माणाची कल्पना आत्मनिर्भर भारत म्हणून केली. पं. दीनदयाल उपाध्याय यांच्या अंत्योदयाच्या संकल्पनेवर आपण सर्व जण काम करीत आहोत. समाजातील शोषित, पीडित, शेवटच्या व्यक्तीला जोपर्यंत अन्न, वस्त्र, निवारा मिळत नाही, तो सुखी, संपन्न होत नाही, तोपर्यंत हे काम सुरु राहणार आहे.
देशातील 115 मागास जिल्हे,ग्रामीण आणि आदिवासी भागाचा विकास हे आपले पहिले प्राधान्य असल्याचे सांगून ना. गडकरी म्हणाले- ग‘ामीण व मागास भागात आज बेकारी, भूखमरी, गरिबी आढळते. शिक्षणाचा अभाव, आरोग्याच्या सोयींपासून लोक वंचित आहेत. त्यांना सुखी, संपन्न व शक्तिशाली करणे म्हणजेच आत्मनिर्भर भारत निर्माण करणे होय. गरिबीमुळे ग्रामीण भागातील लोक रोजगारासाठी शहराकडे येतात व शहरातील समस्या जटिल होतात. यापेक्षा ग्रामीण भागात त्यांच्या गावातच त्यांना रोजगार उपलब्ध झाला, तर ते शहराकडे धाव घेणार नाहीत. यासाठी ग्रामीण भागातील हस्तकला, हातमाग, हस्तकलेचे उद्योग, कुटीर उद्योग यांचा विकास करून गावातील उद्योगांना मजबूत करणे, विकास करणे आवश्यक आहे. शहर आणि जिल्ह्यातील प्रत्येकी 10 हजार तरुणांना आपण रोजगार उपलब्ध करून देऊ शकू काय, यासाठी आपल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले पाहिजे. सेवेचे आणि विकासाचे राजकारण करून आत्मनिर्भर भारताची संकल्पना साकार करा, असेही ते म्हणाले.