जालन्यात पोलिसांनी आंदोलकांवर केलेल्या लाठीमाराच्या घटनेमुळे मराठा समाज आक्रमक झाला आहे. उद्या राज्यात बंदची हाक येऊ शकते. राज्यात ठिकठिकाणी आंदोलने केली जात आहे. काही ठिकाणी आंदोलकांनी एसटी बसेसची तोडफोड केली आहे. तर आतापर्यंत १४ ते १५ एसटी बस जाळण्यात आल्या आहेत.
यामुळे महामंडळाचं मोठं नुकसान झालं असून मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर एसटीच्या मालमत्तेचे नुकसान होणार नाही याची खबरदारी घ्या, असे आदेश राज्य परिवहन मंडळाने राज्यातील सर्व आगारांना दिले आहेत.
सध्या नाशिकहून छत्रपती संभाजीनगर, जालना आणि नंदुरबार एसटी बस सेवा बंद ठेवण्यात आली असून हिंगोली आगाराची एसटी बस वाहतूक पूर्णत: बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, एसटी बस बंद असल्याचे प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत.