बिनशेती प्लॉटची(NA) तुकडा बंदीच्या नावाखाली नोंदी करण्यास महसूल विभागाकडून टाळाटाळ केली जाते. या मनमानीमुळे जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील अनेक खरेदी दस्तांच्या नोंदी महसूल प्रशासन करीत नसल्याची स्थिती आहे. परवानगीच्या नावाखाली संबंधित अधिकारी नागरिकांना वेठीस धरत आहेत, अशी तक्रार जिल्हाधिकारी अमन मित्तल यांच्याकडे केली आहे. जिल्ह्यात सर्वत्र बिनशेती प्लॉटची खरेदी-विक्री होऊन त्याची महसूल विभागाकडे नोंदणी होत आहे. मात्र, असे असूनही फैजपूर उपविभागीय/प्रांत कार्यालयाची परवानगी घेण्याच्या अट्टहासामुळे नागरिकांना प्रांताधिकारी व तहसीलदार कार्यालयाच्या चकरा माराव्या लागतात.
नागरिकांचा अनुभव…
तालुक्यातील निंबोल येथील कन्हैय्यालाल सीताराम धोबी यांनी रावेरच्या कार्यालयात २४ नोव्हेंबर रोजी खरेदीखत दस्त नोंदणी केली आहे.पण, या दस्ताची सक्षम अधिकाऱ्याच्या परवानगीच्या नावाखाली मंडळ अधिकारी जी.एन.शेलकर यांनी नोंदणी करण्यास नकार दर्शवीला. याबाबत तहसील कार्यालयात विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे दिली, असे धोबी यांनी तक्रारीत नमूद केले आहे. कोणत्याही सक्षम अधिकाऱ्याचा लेखी आदेश नसताना प्रांत कार्यालयाने या नोंदी थांबवल्या आहेत. त्यातून जनतेला विनाकारण त्रास दिला जातो. या प्रकरणी कारवाई करण्याची मागणी लेखी तक्रारीद्वारे केली आहे.खरेदीपूर्वी परवानगी घ्या तुकडा बंदीचा नियम शासनाचा आहे. याबाबत न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे, असे सांगून वेळ मारून नेत असल्याचे दिसतेय.
विश्वभारत News Website