देशभरासह काही राज्यांमधून परतीच्या पावसाला सुरुवात झाली आहे. मात्र तरीही, अद्याप महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम आहे. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अजूनही पावसाच्या सरी कोसळत आहे. पावसामुळे खरीप पिकांना जीवदान मिळालं असून बळीराजा सुखावला आहे. त्याचबरोबर धरणांमधील पाणीसाठ्यात देखील किंचित वाढ झाली आहे. आता हवामान खात्याने येत्या २४ तासांत राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
येत्या ४८ तासांत राज्यात मुसळधार पाऊस होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. हा अंदाज खरा ठरला असून मंगळवारी (३ ऑक्टोबर) राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. आता पुढील २४ तासांत पावसाचा जोर आणखीच वाढणार असं हवामान खात्याने सांगितलं आहे.
मुंबई, पुणे, ठाण्यात आजही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्याचबरोबर मराठवाडा आणि विदर्भातही पावसाच्या हलक्या सरी कोसळतील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. विदर्भातील काही जिल्ह्यांना अलर्ट देखील जारी करण्यात आला आहे. दुसरीकडे राज्यातील काही भागांमध्ये ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे.
बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झालं आहे. त्यामुळे सध्या राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे. गेल्या दोन दिवसांपासून कोकणासह किनारपट्टी भागाला पावसाने चांगलंच झोडपून काढलं आहे. मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांनाही पावसाने तडाखा दिला आहे.
दरम्यान, परतीचा पाऊस सुरू झाल्याने येत्या ५ ऑक्टोबरपर्यंत देशातील विविध राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पश्चिम बंगाल, सिक्कीम, बिहार, झारखंडमध्ये 5 ऑक्टोबरपर्यंत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. याशिवाय ईशान्य भारतातील आसाम, मेघालय, मणिपूर, नागालँड आणि त्रिपुरामध्ये पावसाचा जोर कायम राहिल, असं सांगण्यात आलं आहे.