Breaking News

नागपुरात अधिवेशनादरम्यान ११ लाखाचा दरोडा

नागपुरात मायबाप सरकार आहे. सारं काही आलबेल असल्याचे चित्र रंगविले जात आहे. मात्र, नागपुरातील कपिलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत खसाळा-म्हसाळा गावातील एका कंपनीच्या व्यवस्थापकाच्या घरात पाच सशस्त्र दरोडेखोरांनी खिडकी तोडून प्रवेश केला. कुटुंबीयांना शस्त्राच्या धाकावर ओलिस ठेवून घरातील सर्व किंमती वस्तू, रोख, दागिने असा एकूण ११ लाखांचा मुद्देमाल लुटला. पळून जाताना व्यवस्थापकाचे अपहरण करून त्यांच्याच कारने पळ काढला. कोराडीत पोहचल्यानंतर अपहृत व्यवस्थापकाला कारमधून ढकलून दिले. शहरातील कायदा व सुव्यवस्थेची लक्तरे वेशीला टांगणारी ही घटना सोमवारी रात्री अडीच वाजता घडली.

राजेश शेबील पांडे (६०, रा. खसाळा-म्हसाळा, जगदंबानगर) हे पत्नी व मुलीसह राहतात. राजेश पांडे वाहतूक कंपनीत व्यवस्थापक पदावर कार्यरत आहेत. रात्री दोन वाजताच्या सुमारास पाच सशस्त्र दरोडेखोरांनी घराच्या खिडकीचे गज कापून प्रवेश केला. पहिल्या माळ्यावरील घरात शिरताच एकाने राजेश यांच्या गळ्यावर तलवार ठेवली. तर पत्नी आणि मुलीला खुर्चीवर बसून ठेवले.

कपाटात ठेवलेले ६ लाख रुपये व पाच लाख रुपये किंमतीचे सोने असा एकूण ११ लाख रुपयांचा मुद्देमाल एका पिशवीत भरला. त्यानंतर राजेश यांना कारची किल्ली मागितली. राजेश यांना चाकूच्या धाकावर बाहेर नेऊन कारमध्ये बसवले.

तर एकाने त्यांच्या पत्नी व मुलीला आरडाओरड केल्यास किंवा शेजाऱ्यांना कळवल्यास राजेश यांचा खून करण्यात येईल, अशी धमकी दिली. घरातील सर्व भ्रमणध्वनी संच एका दरोडेखोराने सोबत घेतले आणि राजेशच्याच कारने दरोडेखोरांनी पळ काढला. कोराडी तलावाजवळ दरोडेखोरांनी राजेश यांना कारमधून खाली ढकलले आणि पळ काढला. याप्रकरणी कपिलनगर पोलिसांनी तक्रारीवरून गुन्हा दाखल केला.

टिप देऊन दरोड्याचा संशय

राजेश पांडे यांच्या घरातील रोकड आणि सोन्याच्या दागिन्यांबाबत कुणीतरी दरोडेखोरांना टिप दिली असावी. त्यामुळे दरोडेखोरांनी कट रचून दरोडा घातला. ‘अपेक्षेपेक्षा कमी सोने आणि रक्कम मिळाली’ असे एका दरोडेखोराने दुसऱ्याला सांगितले. चोरट्यांनी घरातील सीसीटीव्ही फुटेजचे ‘स्टोरेज’ असलेला ‘डीव्हीआर’सुद्धा नेला. त्यामुळे दरोडेखोरांना घरातील मुद्देमालाबाबत कुणातरी आगाऊ माहिती होती, असा संशय आहे.

शहरातील कायदा व सुव्यवस्था बिघडली !

सध्या हिवाळी अधिवेशन सुरू असून शहरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आहे. तरीही शहरात गुन्हेगारीच्या घटना वाढत आहेत. कपिलनगरातील एका घरात पाच दरोडेखोरांनी दरोडा घालून ११ लाख रुपये लुटून नेले. तर नंदनवनमध्ये एका स्टुडिओमध्ये घुसून एका आरोपीने पिस्तूल दाखवून लुटल्याची घटना घडली. अशा घटनांमुळे शहरातील कायदा व सुव्यवस्था बिघडल्याचे चित्र आहे. कपिलनगर पोलीस थातूरमातूर गस्त घालत आहेत. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचाही वचक संपला आहे.

About विश्व भारत

Check Also

रायपुर में 2 फर्जी कंपनियों का पर्दाफाश : विदेशों से लिंक

रायपुर में 2 फर्जी कंपनियों का पर्दाफाश : विदेशों से लिंक टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक …

नागपुरातील ‘हेवन स्पा’मध्ये सेक्स रॅकेट : कॉलेज तरुणींकडून देहव्यापार

नागपुरातील लक्ष्मीनगरसारख्या गजबजलेल्या चौकात स्पा-मसाज सेंटरच्या नावावर सुरु असलेल्या ‘सेक्स रॅकेट’वर गुन्हे शाखेने छापा घातला. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *