विश्व भारत ऑनलाईन :
महापालिका निवडणुकांसाठी कामाला लागा, असे आदेश मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिले. आपल्याकडे तीन महिन्यांचा कालावधी आहे. त्यामुळे कामात मागे पडू नका. पूर्ण ताकदीनिशी तयारीला लागा, अशाही सुचना त्यांनी कार्यकर्त्यांना दिल्या. दरम्यान, राज ठाकरे यांच्या विदर्भ दौऱ्याला आजपासून (दि.१८) जल्लोषात सुरूवात झाली. यावेळी नागपुरात त्यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. तेव्हा त्यांनी नागपूरच्या मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
उज्ज्वल निकम यांनी घेतली भेट
ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांनीही नागपुरात आज राज ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली. एका खटल्याच्या कामानिमित्त आज नागपुरात आलो असता राज ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतल्याचे उज्ज्वल निकम यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.दरम्यान, रविवारी सकाळी साडे आठ वाजता मुंबईहून विदर्भ एक्सप्रेसने राज ठाकरे यांचे नागपुरात आगमन झाले. राज ठाकरेंचे ढोल ताशांच्या गजरात नागपूर रेल्वे स्थानकावर स्वागत करण्यात आले. यावेळी मनसैनिकांची प्रचंड गर्दी झाली होती.
सोमवारी चंद्रशेखर बावनकुळे यांची घेणार भेट
मनसेचे नेते पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनानंतर राज ठाकरे उद्या सोमवारी सकाळी साडेनऊ वाजता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेणार आहेत. या भेटीत आगामी निवडणुकांच्या संदर्भात चर्चा होणार असल्याची माहिती आहे.
येथे होणार दौरे
४ ते ५ वर्षाच्या कालावधीनंतर राज ठाकरे हे पहिल्यांदाच नागपूरमध्ये दाखल झाले आहेत. मिशन विदर्भ अंतर्गत राज ठाकरे नागपूर, चंद्रपूर, बुलढणा, वर्धा, अमरावती या जिल्ह्यांना भेटी देणार आहेत. या दौऱ्यादरम्यान, राज ठाकरेंच्या दोन पत्रकार परिषदांचे देखील आयोजन करण्यात आले आहे. या संपूर्ण दौऱ्यादरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेची रणनिती ठरवली जाण्याची दाट शक्यता आहे.
राज ठाकरे यांनी वारंवार नागपुरात येत राहावं आणि कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवत राहावं, अशी भावना यावेळी मनसैनिकांनी व्यक्त केली. विदर्भात पक्ष बांधणीसाठी राज ठाकरे मैदानात उतरले आहेत. नागपुरातील मनसेच्या महिला आघाडीच्या पदाधिकारीही फेटे घालून बैठकीसाठी पोहोचल्या होत्या.