अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील निळवंडे परिसरात खडके वस्तीवरील ६५ वर्षीय महिलेला बिबट्याने १०० फूट फरफटत नेऊन फडशा पाडल्याची घटना घडली.तालुक्यात बिबट्याने दुसरा बळी घेतला असून नागरिकांमध्ये बिबट्याची दहशत वाढली आहे.
घटना कशी घडली?
खडके वस्तीवर रखमाबाई तुकाराम खडके ( वय ६५ वर्षे) या राहत असुन काल रात्री त्या सपराच्या घरात झोपल्या होत्या. मध्यरात्रीनंतर बिबट्याने घरात प्रवेश करुन त्यांच्यावर हल्ला केला. त्यांना १०० फूट ओढत नेऊन त्यांचा फडशा पाडला. या हल्ल्यात रखमाबाई खडके यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेने निळवंडे व परिसरातील गावामध्ये दहशतीचे वातावरण तयार झाले आहे. वारंवार बिबट्याचे हल्ल्याने शेतकरी वर्ग त्रस्त झाला आहे. बिबट्याचा वावर पूर्वीही होता. मात्र, आता तो मोठ्या प्रमाणात वाढला असुन बिबटे माणसांवरही हल्ले करु लागले असल्याने वनविभागाने गावोगावी पिंजरे लावावेत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
लहान मुलांची घ्या काळजी
या घटनेच्या एक दिवसपूर्वी याच ठिकाणाहून बिबट्याने शेळी नेली होती. त्यामुळेच गुरुवारी पुन्हा येत बिबट्याने हल्ला केला असावा, असा अंदाज वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला आहे.सदर घटनेचा पंचनामा करुन मृतदेहाचे अकोले ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. अकोले तालुक्यात उसाचे प्रमाण वाढले असल्याने बिबट्याचा वावर जास्त प्रमाणावर वाढला आहे. शिकारीसाठी बिबट्याचा वावर मानव वस्तीमध्ये वाढला असून अशी घटना पुन्हा घडू नये म्हणुन सर्व नागरिकांनी स्वतः काळजी घ्यावी. विशेष करून लहान मुलांवर लक्ष ठेवावे, असे आवाहन राजूर वनक्षेत्रपाल राजश्री साळवे यांनी केले.