काही दिवसांपूर्वी प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. त्यानंतर आता एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकारकडून राज्यातील बड्या आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. तर काही अधिकाऱ्यांची पदोन्नती करण्यात आली आहे. या बदलीच्या यादीत विश्वास नांगरे पाटील सदानंद दाते, अमरावतीच्या पोलीस आयुक्त आरती सिहं यांचाही समावेश आहे.
या बदली आणि पदोन्नतीबाबत शासन आदेश जारी केले गेले आहेत. विश्वास नांगरे पाटील यांना लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या अप्पर महासंचालकपदी पदोन्नती देण्यात आली आहे. विश्वास नांगरे पाटील हे आतापर्यंत मुंबई सहपोलीस आयुक्त पदावर होते. तर मिरा भाईंदरचे पोलीस आयुक्त असलेले सदानंद दाते यांची बदली ही राज्याच्या दहशतवादी विरोधी पथकाच्या अप्पर पोलीस महासंचालकपदी करण्यात आली आहे.
अमिताभ गुप्तांची पुणे आयुक्तपदावरून बदली झालीय. ते आता अमिताभ गुप्ता कायदा सुव्यवस्थेचे अप्पर पोलीस महासंचालक असणार आहेत. तर रितेश कुमार हे पुण्याचे नवे पोलीस आयुक्तपदाची जबाबदारी सांभळणार आहेत. विनय कुमार चौबे हे पिंपरी-चिंचवड आणि मिलिंद भारंबे नवी मुंबईचे नवे पोलीस आयुक्त असतील. तर अमरावतीच्या पोलीस आयुक्त आरती सिंह यांची मुंबईत बदली झाली आहे.