जालना जिल्ह्यातील हृदयद्रावक घटना आहे. शेतकरी कुटुंबातील ३३ वर्षीय तरुणाच्या फुप्फुसात चार वर्षांपासून अडकलेली सुई शस्त्रक्रिया करून बाहेर काढण्यात डॉक्टरांना अखेर यश आले. शहरातील एका खासगी रुग्णालयात एक तास चाललेल्या या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेमुळे तरुणाला जीवदान मिळाले.
जालना जिल्ह्यातील शेतकरी कुटुंबातील हा तरुण असून चार वर्षांपूर्वी त्याने शिलाई मशिनची सुई तोंडात धरली असताना अचानक खोकला आला. त्यामुळे तोंडातील सुई थेट गिळली जाऊन फुप्फुसात अडकली होती. खोकला आल्यावर तोंडातून रक्त पडू लागल्याने रुग्ण व नातेवाइकांची चिंता वाढली होती. शहरातील खासगी रुग्णालयात त्याच्या उजव्या फुप्फुसाच्या खालच्या भागात सुई अडकल्याचे निदान झाले. या रुग्णालयातील कान-नाक-घसा तज्ज्ञ डॉ. अमोल सुलाखे व त्यांच्या टीमने रुग्णाची शस्त्रक्रिया करून फुफ्फुसात अडकलेली सुई बाहेर काढली. शस्त्रक्रियेच्या दोन दिवसांनंतर या तरुणास रुग्णालयातून सुटी दिली आहे.