राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि अदाणी समुहाचे सर्वेसर्वा गौतम अदाणी या दोघांचीही शरद पवार यांच्या मुबंईतील सिल्वर ओक या बंगल्यावर भेट झाली आहे. या दोघांमध्ये बंददाराआड दोन तास चर्चा झाली. या चर्चेचा तपशील अत्यंत गोपनीय ठेवण्यात आला आहे. मात्र गेल्या काही दिवसांमध्ये घडलेल्या घडामोडी पाहता या भेटीला अनन्यसाधारण महत्त्व आलं आहे यात काहीही शंका नाही. आज सकाळी १० वाजून १० मिनिटांनी गौतम अदाणी हे आपल्या काळ्या रंगाच्या कारमधून सिल्वर ओक या शरद पवार यांच्या निवासस्थानी आले. त्यानंतर बंद दाराआड या दोघांमध्ये चर्चा झाली. तर, राष्ट्रवादी आणि भाजपची जवळीक अदानी यांच्या माध्यमातून वाढत आहे, असे चित्र आहे.
गौतम अदाणी यांनी २० हजार कोटींचा भ्रष्टाचार केला असा हिंडेनबर्गचा अहवाल आल्यानंतर खळबळ माजली होती. हिवाळी अधिवेशनात राजकीय वातावरण तापलं होतं. मात्र काही दिवसांपूर्वीच शरद पवार यांनी हिंडेनबर्ग हे नाव आपण ऐकलं नाही असं म्हटलं होतं. तसंच जेपीसी ऐवजी सर्वोच्च न्यायालयाची समिती या प्रकरणात योग्य असेल असंही म्हटलं होतं. त्या सगळ्या पार्श्वभूमीवर गौतम अदाणी आणि शरद पवार यांच्यात झालेली भेट सूचक आहे. शरद पवार आणि गौतम अदाणी यांच्यात नेमकी काय चर्चा झाली याबाबत अदाणी किंवा शरद पवार यांच्याकडून काहीही तपशील समोर आलेला नाही. शरद पवार आणि गौतम अदाणी हे एकमेकांना भेटले तेव्हा त्या ठिकाणी कुणीही इतर उपस्थित नव्हते.